बुलढाणा : राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आज, शुक्रवारी मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत जिल्ह्यासह राज्यातील हजारो भाविक दाखल झाले. लखुजी राजे राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थानी हजारो भाविक नतमस्तक झाले आहेत. राजमातेला मानाचा मुजरा करण्यासाठी जिजाऊ प्रेमींच्या सकाळपासून रांगा लागल्या आहे.
लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊ जयंतीउत्सव सोहळा पारंपारीक पद्धतीने साजरा करण्यात आला. राजवाड्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. जिजाऊंचे जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात आले आहे. ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणा देत सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरिक येत आहेत. लखोजी जाधव यांच्या वंशजांनी राजमाता जिजाऊंची आरती व जिजाऊ वंदन केले. त्यानंतर राजवाडा परिसरामध्ये फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
हेही वाचा : पत्नीला दिरासोबत ‘नको त्या’ अवस्थेत बघितले अन…
पालकमंत्री वळसे पाटील जिजाऊ चरणी नतमस्तक!
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीदिनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज सिंदखेडराजा येथील जिजामातेच्या जन्मस्थळी नतमस्तक झाले. त्यांनी राजे लखुजी जाधव यांच्या प्रतिमेलाही अभिवादन केले. राजमातेच्या विचारांवरच महाराष्ट्रची चौफेर प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतिश तायडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.