बुलढाणा : शेगाव येथील संस्कार राजेंद्र सोनटक्के ( राहणार आदर्श नगर शेगाव, जिल्हा बुलढाणा) या अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू मेंदू ज्वरानेच झाल्याचा दावा आरोग्य यंत्रणानी केला आहे. विविध अहवालवरून हे निष्पन्न झाले असल्याचेही आरोग्य यंत्रणाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, सोनटक्के परिवार राहत असलेल्या शेगाव मधील आदर्श नगर परिसरात आज शनिवारी, १२ एप्रिल रोजी मेंदू ज्वर विषयक व्यापक आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ मध्ये इयत्ता सहावीचा विध्यार्थी असलेल्या संस्कार सोनटक्के ( वय अकरा वर्षे ) याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची वार्ता शेगाव मध्ये पसरली. आरोग्य यंत्रणा खळबळून सक्रिय झाली. यामुळे संस्कारवर उपचार करण्यात आलेल्या अकोला येथील ऑर्बिट रुग्णालयाशी संपर्क साधण्यात आला. तेथील डॉक्टरांनी संस्कारचा मृत्यू मेंदू ज्वराने झाल्याचे बुलढाणा व अकोला मधील शासकीय आरोग्य यंत्रणना सांगितले.

काय म्हणाले अधिकारी?

अकोला महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आशीष गिऱ्हे यांनी, संस्कारचा मृत्यू विषाणूजन्य मेंदू ज्वर ( व्हायरल इनसेफलोपॅथी) ने झाल्याचे सांगितले. आपल्या विभागाने केलेल्या चौकशीतही ही बाब स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. संस्कारच्या आजाराची लक्षणे मेंदू ज्वराशी निगडित होती. त्याच्या मेंदू जल परीक्षणाचे अहवाल देखील हेच दर्शवितात, असे गिऱ्हे यांनी सांगितले.

अधीक्षक म्हणाले…

शेगाव येथील सईबाई मोटे शासकीय उप जिल्हा रुग्णालयाने देखील हाच दावा केला आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी मेंदू ज्वरानेच संस्कारचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे दक्षता म्हणून शेगाव मध्ये पाहणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सात रुग्ण…

सोनटक्के परिवार राहत असलेल्या आदर्श नगर ( शेगाव) भागात आज विविध आरोग्य यंत्रणानी आज शनिवारी, १२ एप्रिल रोजी सकाळ पासून सर्वक्षण मोहीम राबविली. आदर्शनगर मधील १८५ घरा मधील ६७५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात सात जणांना साधा ताप असल्याचे आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यांचे रक्त नमुने संकलित करुन तपासणी साठी पाठविण्यात आले आहे.