बुलढाणा : शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठबळामुळे मोठे होऊन त्यांनी गद्दारी केली. त्यापैकी पाच गद्दारांना निवडणुकीपूर्वीच (उमेदवारीच न मिळाल्याने) धडा मिळाला आहे. उर्वरित गद्दारांना जनता अर्थात मतदार धडा शिकविणार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. बुलढाणा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज अर्ज दाखल केला. यानंतर पार पडलेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जालिंदर बुधवत, राष्ट्रवादीचे रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुषमा अंधारे म्हणाल्या, गद्दारांना आतापासूनच केलेल्या कामाची ‘फळे’ मिळत आहे. यवतमाळ, नाशिक आदी ठिकाणचे पाच विद्यमान खासदार अगोदरच बाद झाले. बुलढाण्यासह बाकीच्यांना जनता जनार्दन धडा शिकवणार हे उघड आहे. मूळ, निष्ठावानांच्या शिवसेनेचाच विजय होणार आहे. याचे कारण, ‘बाप तर बाप होता है, ओरिजनल तो ओरिजनल होता है,’ हे तेवढेच खरे. भाजपवाले टेंभी नाक्याकडे वाटाघाटीसाठी आले नाही तर त्यांना मुजरा, कुर्निसात करण्यासाठी दिल्लीला पाचारण करण्यात आले. हे एवढ्यावरच थांबणार नसून निवडणुकीत मतदार गद्दारी करणाऱ्यांची धूळधाण करणार असल्याचे भाकित सुषमा अंधारे यांनी केले.