बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अटकेचे पडसाद जिल्ह्यात ठिकठिकाणी उमटले. मुख्य मार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी तुपकरांच्या अनेक कार्यकर्ते व समर्थकांना स्थानबद्ध केले. चिखली तालुक्यातील पेठ व त्यापाठोपाठ खामगाव तालुक्यातील अनेक गावांत टायर जाळून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी, शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
यापूर्वी आज शनिवारी दुपारी कडक बंदोबस्तात रविकांत तुपकरांना बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली.
त्यानंतर तुपकरांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तुपकरांनी येत्या २९ तारखेला मुंबई येथील मंत्रालय ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ते २८ ला शेतकऱ्यांसह मुंबईकडे निघणार आहेत.
हेही वाचा : रविकांत तुपकर पोलिसांच्या ‘ताब्यात; कारण काय? जाणून घ्या…
अटकेच्या निषेधार्थ गळफास घेण्याचा प्रयत्न
एका कार्यकर्त्याने बुलढाणा पोलीस ठाण्यासमोरील वडाच्या झाडावर चढून दोरखंडाच्या मदतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र बुलढाणा शहर पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेल्याने संभाव्य अनर्थ टळला.