बुलढाणा: चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे या गावाने काल मंगळवारी रात्री निसर्गाच्या तांडवाचे रौद्र रूप अनुभवले! भीषण वादळाच्या झंझावातात अनेक घरांचे नुकसान झाले. एका घरातील टिनपत्राच्या छताला बांधलेला पाळणा हवेत उडाल्याने चिमुकलीचा करुण अंत झाला. देऊळगाव घुबे गावात १२ जूनला वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. लगेच वीज पुरवठा खंडित झाला. काही मिनिटांतच वादळाने रौद्र रूप धारण केले. यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली, कच्च्या घरांची पडझड झाली. वादळाचा वेग एवढा होता की सारे गावकरी जीव मुठीत धरून आपापल्या घरात बसले होते. गावातील अनेक झाडे या वादळात कोसळली.
देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची सहा महिन्यांची चिमुकली मुलगी सई साखरे ही घराच्या टिन, लोखंडी ‘अँगल’ ला बांधलेल्या झोक्यात झोपलेली होती. घरातील इतर सदस्य जेवायला बसणार तेवढ्यात वादळाने घरावरील टिनपत्रे लोखंडी अँगल आणि बांधलेल्या झोक्यासह उडून गेली. वादळाचा आवेग इतका भीषण होता की टिनपत्रे २०० फूट अंतरावर जाऊन जमिनीवर आदळली. या घटनेत चिमुकल्या सईचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
हेही वाचा : बेरोजगारांनो सावधान! नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी पुन्हा सक्रिय
सई हिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. या वादळात गावातील ३० ते ४० घरांचे नुकसान झाले आहे. देऊळगाव घुबे गावासह परिसरातील अनेक गावांना वादळाने तडाखा दिल्याचे वृत्त आहे. यामुळे अनेक घरावरची टिनपत्रे उडाली. अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांचे रात्रभर बेहाल झाले.
हेही वाचा : “…तर एका मिनिटात राजीनामा देणार’’, जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेने भाजपमध्ये भूकंप; १४ जूनकडे लक्ष…
किनगाव राजात विजेचे थैमान
दरम्यान, चिखली तालुक्याप्रमाणेच सिंदखेडराजा तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावली. किनगाव राजात काल मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. किनगाव राजा शिवार परिसरातील गट क्रमांक चारशे ब्याऐंशी मध्ये योगेश सुधाकर चतुर यांचे शेत आहे. या शेतातील गुरांच्या गोठ्यावर विजेचा लोळ कोसळला. यामुळे गोठ्या जवळ बांधून ठेवलेला बैल जागीच दगावला. सिंदखेडराजा तहसीलदार कार्यालय अंतर्गतच्या महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर बैल दगावल्याने योगेश चतुर यांना सिंदखेड राजा तहसीलने तातडीची मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.