बुलढाणा : आधुनिक युगातील माणूस देखील किती खालच्या थराला जाऊ शकतो, गृह लक्ष्मीचा छळ करताना किती विकृतपणे वागू शकतो याचा भीषण प्रत्यय आणणारा हा घटनाक्रम धाड (ता. जि. बुलढाणा) येथे घडला आहे.
तीन वर्षे नरक यातना भोगणाऱ्या आणि सुदैवाने बचावलेल्या विवाहित महिलेने अखेर माहेर गाठले. हा अमानवीय छळ असह्य झाल्याने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आपल्यावरील ‘आपबीती’ ची व्यथा मांडणारी तक्रार दिली आहे.
हे ही वाचा…नागपूर हिट अँन्ड रन प्रकरणावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ” पोलिसांकडे…”
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहे. लग्नात हुंडा कमी दिला आणि कथितरीत्या मुलबाळ होत नाही त्यामुळे पती आणि त्याच्या नातेवाईकांनी अमानुष छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अघोरी विद्यासाठी वापर
हुंड्याच्या मागणीसाठी व बाळ देऊ शकत नसल्याचे कारणावरून फिर्यादी विवाहितेला जादूटोण्यासाठी बळी देण्याची धमकी देण्यात आली. सासरी असताना तिच्या बिछान्यावर अघोरी विद्या साठी वापरण्यात येणारे लिंबू, गंडे आदी साहित्य टाकण्यात आले.तू मुलबाळ तर देऊ शकत नाही, मग तुझा वापर जादूटोणा साठी का करु नये? असे वारंवार सांगून तिला छळण्यात आले. ती पाणी तापवित असलेल्या भांड्यात आणि गरम पाण्यात विजेचा ‘करंट’ सोडण्यात आला.पतीने फिर्यादी हिचे मर्जी विरुध्द अश्लील चित्रफित दाखविले. तसेच अन्य आरोपीने, तु आमच्या घराला मुल देऊ शकत नाही तर मग तुझा बळी जादू टोण्याच्या वापरा करीता करते असे म्हणुन फिर्यादीचे बिछाण्या जवळ लिंबु व इतर अघोरी प्रथाचे साहित्य टाकले.
पिडीतेच्या बोटाला चाकु मारुन तसेच फिर्यादीने शेगडीवर पाणी तापविण्यासाठी ठेवले असता आरोपींनी त्या पाण्यात विजेचा करंट सोडल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. तिच्या सोबत हा सर्व अघोरी प्रकार मे २०२१ ते १० जून २०२४ दरम्यान ती सासरी असताना करण्यात आला.
हे ही वाचा…VIDEO : नागपूर ‘हिट अँड रन’चा थरार : सीसीटीव्ही फुटेज आले समोर
सासर नात्यातीलच
नात्यात असलेल्या धाड येथील युवकासोबत तिचा विवाह मुस्लिम विवाह पद्धतीने पार पडला होता. धाड येथील टिपू सुलतान चौक मधील तवक्कल नगर मध्ये तिचे सासर आहे. या अमानवीय छळाला कंटाळून पीडित विवाहिता ही माहेरी वडिलांच्या घरी देउळगांव राजा येथे रहायला आली. पीडितेने देऊळगाव राजा पोलिसांकडे ही तक्रार नोंदविली. यावरून देऊळगाव राजा पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ (अ), ३५१, ३५४ (अ) (१) (२), ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल केले. तसेच मुस्लीम महीला विवाह अधिकार संरक्षण अधिनियम २०१९ च्या कलम ३ तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ कलम ३(२)(३) तसेच सहकलम हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ च्या कलम ३व ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पती मोहम्मद शहबाज मोहम्मद इकबाल, सासरा मोहम्मद इकबाल मोहम्मद यासीन ,सासू शेबानाबी मोहम्मद इकबाल , दिर मोहम्मद शाहादात मोहम्मद इकबाल, जाऊ सलमा परवीन मोहम्मद शाहदाब, नणंद सबा अज्जुम मोहम्मद अतिक तक्रारदाराची नणंद अशी आरोपींची नाव आहे. यातील पाहिले सहा आरोपी तवक्कल नगर टिपु सुलतान चौक, धाड तालुका आणि जिल्हा बुलढाणा तर रमीजा परवीन अक्रम खान गैबीपुरा, रिसोड तालुका रिसोड जिल्हा वाशीम येथील रहिवासी आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक भारत चिरडे करीत आहे.