बुलढाणा : ‘तो’ तसा अकोला जिल्ह्यातील रहिवासी. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड त्याचे गाव. मात्र त्याने आपल्या ‘धंद्याचा’ विस्तार, अकोला जिल्ह्याला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही गावापर्यंत केला. गर्दीच्या ठिकाणी उभ राहायचं,’ शिकारी’ वर बारीक नजर ठेवायची अन सर्व जुळून आले की दुचाकी की घेऊन आपल्या जिल्ह्यात फुर्रर्र व्हायचे आणि वाहनाची विल्हेवाट लावायची ही त्याची ‘मोडस ऑपरेंडी’ अर्थात कार्यपद्धती!
मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा ( तालुका संग्रामपूर) परिसरात केलेल्या चोऱ्या त्याला महागात पडल्या आणि तो बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. कलीम उद्धीन सलीम उद्धीन (३२ वर्षे, राहणार हिवरखेड तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला.) असे त्याचे नाव. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने त्याला उचलले आणि त्याने चोरलेल्या तीन मोटार सायकल सह सोनाळा येथे आणले. कलीम उद्धीन ला सोनाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बि. बि. महामुनी, श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील सोनाळा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेल्या मोटरसायकलचा समांतर तपास करण्यात आला.
सोनाळा पोलीस ठाण्या मध्ये मोटरसायकल चोरीचे विविध गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होते . मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे हिवरखेड येथून कलिम उद्दीन याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशी अंती त्याने मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्या ताब्यातून चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. त्याची एकूण किंमत १ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर, पोलीस हवालदार रघुनाथ जाधव, पोलिस जमादार गोपाल तारुळकर, हर्षल जाधव, शिवानंद हेलगे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे ऋषिकेश खंडेराव यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. या कारवाईमुळे पोलीस आणि परिसरातील वाहन धारक यांनी तूर्तास तरी सुटकेचा श्वास घेतला आहे.
सराईत चोरटा
आरोपी कलीम उद्दीन हा सराईत चोरटा असल्याचे सोनाळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. तो बाजारपेठा, बस स्टॅन्ड व इतर वर्दळीच्या ठिकाणी बराच वेळ उभ्या असलेल्या मोटारसायकलीचे निरीक्षण करायचा, चालकांवर लक्ष ठेवून त्याचा कार्यभाग तो उरकत होता. आरोपी सलीम उद्दीन याला स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुने सोनाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.