बुलढाणा : मराठवाड्यातील दोन महिला बुलढाण्यात आल्या. यानंतर त्यांनी न्यायाधीश निवासस्थानाच्या भिंतीवरून चढून थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या बंगल्यात प्रवेश केला. ही बाब लक्षात येताच एकच खळबळ उडाली. दोन्ही महिलांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
भर वर्दळीच्या संगम चौक परिसरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची शासकीय निवासस्थाने आहेत. या निवासस्थानांच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा २४ तास पहारा असतो. अशा कडेकोट बंदोबस्तातही या महिला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचल्या. त्यांनतर दोघी चोरी करण्याच्या उद्देशाने भांडार कक्षात (स्टोर रूम) गेल्या. बंगल्यावर तैनात असलेले बुलढाणा जिल्हा न्यायालयाचे शिपाई शेळके यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ पोलीस हवालदार पंकज रमेश गायकवाड (४६, रा. बुलढाणा) यांना माहिती दिली. हवालदार गायकवाड यांनी दोन्ही महिलांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तुम्ही आत का आल्या, असे विचारले असता त्या दोघींनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हवालदार गायकवाड आणि शिपाई शेळके यांनी वरिष्ठ आणि बुलढाणा शहर पोलिसांना ही माहिती दिली. बुलढाणा पोलिसांनी लगेचघटनास्थळ गाठले.
हेही वाचा : नागपूरकरांसाठी खुशखबर, जिल्हा रुग्णालयाचे काम सप्टेंबर महिन्यात…
पोलिसांनी केलेल्या चौकशीत, आशा दिलीप लावाडकर (४०) व अरुणा रमेश लावाडकर (४५) या दोन्ही महिला मराठवाड्यातून बुलढाण्यात आल्या. त्या मूळच्या माहोरा (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही महिलांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९, ५११, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी न्यायाधीश निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा : नाना पटोले म्हणतात, “अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही”; राज्य सरकारवर टीका
पोलीस मुख्यालय अन् आता न्यायाधीश निवासस्थान
दोन-तीन दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयात तीन लाखांच्या बांधकांम साहित्याची चोरी झाली होती. पोलीस कवायत मैदानानजीक सुरू असलेले पोलीस निवासस्थानाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. तेथील साहित्य चोरांनी बेमालूमरित्या लंपास केले. त्या पाठोपाठ आता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यात घुसखोरी आणि चोरीच्या प्रयत्नाची घटना घडली आहे. त्यामुळे चोरांवर पोलिसांचा वचक उरला नाहीये का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या दोन गंभीर घटनांमुळे चोरट्यांचे वा चोरांच्या टोळ्यांचे मनोधैर्य कमालीचे वाढल्याचे चित्र असून कायदाप्रेमी नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.