बुलढाणा : रंगपंचमीच्या दिवशी बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील दोघा युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. आज शनिवारी १५ मार्चला दुपारी त्यांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
धर्मराज विठ्ठल चिंचोले (३२) व शंकर सुधाकर मोहिते (२५) अशी मृतांची नावे आहेत. हे दोन्ही युवक मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथून आपल्या मूळ गावी पळसखेड भट येथे दुचाकीने येत होते. ते शुक्रवारी, १४ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी संभाजी नगर येथून निघाले. भोकरदनमार्गे पळसखेड भट येथे आपल्या गावी येत असताना भोकरदन मार्गावर हिरेगावजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने भरवेगात जोरदार धडक दिली.
अज्ञात वाहनाच्या धडकीचा वेग इतका होता की त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तसेच धर्मराज चिंचोले आणि शंकर मोहिते हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी संभाजी नगर येथे शासकीय (घाटी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्याने आणि जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने या दोन्ही मित्रांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोन युवकांचे बळी घेणाऱ्या या अपघाताची माहिती येऊन धडकताच पळस खेड भट गावात एकच खळबळ उडाली. चिंचोले व मोहिते परिवारावर सणाच्या दिवशीच संकटाचा डोंगर कोसळला. संभाजी नगर येथील मृत्यूपश्चात सोपस्कार आटोपल्यावर शुक्रवारी रात्री उशिरा या दोघांचे मृतदेह पळसखेड भट येथे आणण्यात आले. आज या दोघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.