बुलढाणा : २०१९ च्या निवडणुकीत आम्ही भाजपसोबत होतो, तेव्हा नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात फारतर पाच सहा सभा घेतल्या. मात्र, आता ते राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फिरताहेत. याचे कारण त्यांना समजून गेले आहे की, आता आपली जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यामुळे मोदी, ‘आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा,’ या धर्तीवर सगळ्यांचा निरोप घेत आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडविली. केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा दावाही त्यांनी बोलून दाखविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खामगाव (जि. बुलढाणा) येथील मेहता शाळेच्या मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ आज रात्री उशिरा उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक, अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह आघाडीच्या प्रमुख नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचा…“देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय,” राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

उद्धव ठाकरे किमान दोन तास उशिरा येऊनही सभेला भरगच्च उपस्थिती होती. यावेळी बोलताना ठाकरे यांनी मोदींना आपल्या भाषणातून लक्ष्य केले. शेतकरी आत्महत्या करतोय, मालाला भाव नाही, युवकांना रोजगार नाही, माताभगिनी महागाईमुळे बेजार झाल्या, पण यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. तुम्ही जगा अथवा मरा, पण मला पंतप्रधान करा, असा मोदींचा खाक्या आहे. भाजपला मतदान का करायचे, असा सवाल करून त्यांनी पीएम किसान योजनेची पोलखोल केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार टाकते आणि खतांवर १८ टक्के जीएसटी लावते. सहा हजार टाकायचे अन् जीएसटीच्या रुपाने आलेला पैसा खिशात घालायचा, हा कसला किसान सन्मान?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिजाऊंच्या जिल्ह्यात भगव्याला कलंक लावणाऱ्या गद्दाराला याच मातीत गाडा, असे आवाहनही त्यांनी प्रतापराव जाधव यांचे नाव न घेता उपस्थितांना केले.

मुकुल वासनिक यांनी मोदींना हुकूमशहा, असे संबोधित त्यांनी व भाजपने मनमानी चालविली असून घर व पक्ष फोडून लोकशाही तत्वांना तिलांजली दिल्याचे सांगितले.

हेही वाचा…मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर दगड भिरकावला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यानची घटना

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

सभा संपल्यानंतर काँग्रेसमधील मतभेद व गटबाजी चव्हाट्यावर आली. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक हजर होते. सभा संपल्यावर प्रवेशद्वाराजवळ काँग्रेसचे तेजेंद्रसिह चव्हाण आणि माजी आमदार सानंदा हे आमने-सामने आले. त्यांच्यात खडाजंगी होऊन कडाक्याचा वादही झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana uddhav thackeray criticise narendra modi said india alliance government will come at the centre scm 61 psg
Show comments