बुलढाणा : ‘वासनातूरा न भयम न लज्जाम’ असे एक संस्कृत भाषेतील सुभाषित आहे. त्याचा अतिरेकी स्वरूपातील आणि दुर्देवी प्रत्यय संग्रामपूर तालुक्यातील एका घटनेने आला. यामुळे त्या गावासह संग्रामपूर तालुक्यातील समाजमन सुन्न झाले असून नराधम विकृत आरोपीविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
वासनांध इसम नात्याला काळिमा फासून काय करू शकतो हे दर्शविणारा हा घटनाक्रम आहे. घटना अतिशय संतापजनक आणि तळपायाची आग मस्तकात नेणारी नाही. नात्याने काका लागणाऱ्या एका नराधम तरुणाने स्वतःच्या अल्पवयीन पुतणीला वासनेची शिकार केली. काही दिवस नव्हे तर तब्बल ४ वर्षांपासून हा विकृत व नराधम काका पुतणीच्या शरीराचे लचके तोडत होता. बळजबरीने मुलीसमान पुतणीवर लैंगिक अत्याचार करीत असतांना त्याचे ‘व्हिडिओ शूट’ करायचे. नंतर ते दाखवून आणि समाज माध्यमावर आणि नातेवाईकांमध्ये सार्वत्रिक करण्याची धमकी देत पुन्हा पुन्हा अत्याचार करायचा. या नराधमाने तब्बल चार वर्षे तिचा शारीरिक, मानसिक छळ, अत्याचार करून तिचे निरागस बालपण, नव्हे तिचे आयुष्यच उध्वस्त केले!
हेही वाचा : ‘लाडक्या बहिणीं’ची लूट, अकोल्यात तलाठी निलंबित; दाखला वितरणात गैरव्यवहार…
अतिरेकाचा कळस आणि बालिकेची तक्रार
तब्बल ४ वर्षांनंतर हिम्मत एकवटून पुतणीने काकाचा अत्याचार समोर आणला आहे. याप्रकरणाची तक्रार संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ मे २०२० रोजी आरोपीने तिला आपल्या जाळ्यात ओढले. अश्लिल चित्रफित दाखवून तिला केवळ १२ वर्ष वय असताना वासनेचा बळी बनविले. तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. याचे व्हिडिओ चित्रीकरण त्याने केले.घडला प्रकार कुणाला सांगितला तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीपोटी पिडीत पुतणीने कुणालाही घडलेला प्रकार सांगितला नाही. त्यामुळे विकृत काकाची हिम्मत वाढत गेली. त्यानंतर हा प्रकार सर्रास होऊ लागला. त्याने संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील पुतणीच्या आणि आपल्या घरी गेल्या ४ वर्षात पुतणीवर शारिरीक अत्याचार केला. बदनामीच्या भीतीने चार वर्षे मौन बाळलग्यावर पीडितेला स्वतःचे भवितव्य अंधारमय दिसू लागले.आता जर याविरोधात आवाज उठवला नाही तर लग्नानंतर देखील आयुष्यभर हा प्रकार अडचणीचा ठरेल. त्यामुळे हिम्मत एकवटून १६ वर्षीय आणि सध्या शिक्षण घेणाऱ्या पुतणीने काकाच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश केला. तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आरोपी विरुद्ध कलम ३७६, ३७६(२),(एफ),(जे), ३७६ (३), ३७६(२),(एन), ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ४५२, ५०४, ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधीनियम २०१२ च्या सहकलम ४, ८,१०,१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.