बुलढाणा: जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. रविवारच्या तुलनेत सोमवारी ( दि.२७)च्या रात्री पडलेल्या पावसाची तीव्रता कमी होती. रविवारी रात्री वादळी वारे , विजांचा कडकडाट आणि गारपीट सह झालेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपले होते. तब्बल २९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली तर दोन मंडळात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. यातुलनेत सोमवारी रात्री झालेला पाऊस मध्यम स्वरूपाचा होता.
जळगाव जामोद ३६ मिलिमीटर, संग्रामपूर ३२.८, चिखली २१, बुलढाणा १३, देऊळगाव राजा २२.३, मेहकर २६,सिंदखेडराजा २१मिमी, लोणार १३, खामगाव २८,शेगाव ३१.३ मलकापूर २४.४, मोताळा २०,नांदुरा २० मिलीमीटर अशी तालुकानिहाय पावसाची आकडेवारी आहे. जिल्ह्यात सरासरी ५७.३ मिमी पावसाने हजेरी लावली आहे.
हेही वाचा : इंडिगो विमानातील आसनाचे कुशन चोरीला, प्रवासी महिलेला मनस्ताप
तुरीला फटका
दरम्यान अवकाळी पावसाचा ऐन बहरात असलेल्या तुरीला जबर फटका बसला. यामुळे ८२ हजार हेक्टर वरील या पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट येण्याची शक्यता आहे. त्यात जिल्ह्याच्या बहुतांश भागात धुके पसरले आहे. यामुळे तुरीवर रोगराई येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहे.