बुलढाणा : वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीच्या संभाव्य आघाडीबद्दल अजूनही संभ्रम असतानाच वंचितच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांची एक राजकीय ‘पोस्ट’ खमंग चर्चेचा विषय ठरली आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टवकारले आहे. वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विविध आंदोलनांमुळे मागील वर्षभरापासून चर्चेत आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी बुलढाण्यात घेतलेली जागतिक धम्म परिषद गाजली. या युवा नेत्याच्या ‘फेसबुक’वर टाकण्यात आलेल्या ‘पोस्ट’मध्ये, “वंचित बहुजन आघाडीचा खासदार, सतीशदादा पवार,” असे नमूद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामध्ये पवार यांचा, “भावी खासदार, आपल्या रक्ताचा, आपल्या हक्काचा सतीशदादा’’, असा उल्लेख करण्यात आला आहे. याबरोबरच, “आता लढणार आणि जिंकणार, बुलढाणा जिल्ह्यात इतिहास घडविणार”, असा दावाही करण्यात आला आहे. या ‘पोस्ट’द्वारे वंचित युवा आघाडीने महाविकास आघाडीला डीवचल्याचे आणि आव्हानही दिल्याचे मानले जात आहे. आघाडीसोबत जुळले नाही, योग्य सन्मान दिला नाही तर ‘है तय्यार हम’चा रोखठोक संदेशही दिल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : काँग्रेस नेते म्हणतात, “वर्धेच्या मोबदल्यात दुसरी जागा द्या, पण वर्धा घ्याच,” राष्ट्रवादी म्हणते, “विदर्भात एक लढणारच…”

मेसेज आला अन्…

यासंदर्भात विचारणा केली असता, “आम्हाला वरून (पक्षाकडून) तातडीचा संदेश आला. आपले (महाविकास आघाडीशी) जुळले नाही तर, निवडणुकीसाठी तयार राहा, असा आदेश पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. यामुळे मी तयारीला लागलो असून नामांकन व अन्य तयारीला लागल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, या ‘पोस्ट’ला वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पवार समर्थकांची पसंती मिळत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राजकीय अस्वस्थता वाढली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana vanchit bahujan aghadi district president satish pawar facebook post to contest lok sabha scm 61 css