बुलढाणा : उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार येथील युवक आणि विदर्भातील खामगाव येथील युवतीची ही ऑनलाइन ( नसलेल्या) प्रेमाची कहाणी. त्यात ‘तो’ लग्नाच्या बेडी ऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकला अन युवतीची बदनामी अन् शैक्षणिक हानी झाली. समाज माध्यमाचे परिणाम दाखविणारा हा घटनाक्रम मागील तीनेक महिन्यातील. मूळचा जळगाव खान्देश पण हल्ली नंदुरबार येथे राहणारा दीपेश लक्ष्मण वाधवाणी याने इंस्टाग्रामवर मैत्रीसाठी विनंती (फ्रेंड रिक्वेस्ट) केली. खामगावकर युवतीने ती मान्य केली. मग मैत्री पक्की झाल्यावर तो नंदुरबार वरून खामगावला मैत्रिणीला भेटण्यासाठी यायला लागला. घनिष्ठता वाढल्यावर लग्नापर्यंत मजल गेली.
हेही वाचा : ‘समृद्धी’वर सर्वाधिक अपघात ‘या’ वेळेत, महामार्ग (सुरक्षा) पोलिसांचा अहवाल
हेही वाचा : वर्धा : नगर परिषदेच्या वाढीव कर आकारणीस स्थगिती
नंतर मात्र त्याने अश्लील संभाषण ( चॅटिंग) सुरू केले. दोघांचे फोटो ‘शेअर’ करणे सुरू केले. मुलीच्या घरी ही बाब माहीती झाल्यावर तिच्या भावाने दीपेशला ताकीद दिली. मात्र, त्याने भावाच्या मोबाईलवर फोटो टाकले. यामुळे बदनामी व शैक्षणिक नुकसान झालेल्या युवतीने बुलढाणा सायबर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी २९ ऑगस्टला प्रेम विरास नंदुरबार येथून ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.