चंद्रपूर : नुकतेच आसाम वनविभागाने गुहावाटी येथे बावरिया टोळीच्या तिघांना वाघाच्या कातडी व हाडांसह अटक केली होती. या टोळीतील काही सदस्य हे चंद्रपूर व गडचिरोली वनक्षेत्रात असल्याची माहिती आराेपींनी दिल्याने चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्ताच्या संयुक्त चमूने गडचिरोलीतील आंबेशिवणी येथून सहा पुरुषांसह, पाच महिला व पाच मुलांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा… चंद्रपूर : राजुऱ्यामध्ये गोळीबार; भाजयुमो नेते सचिन डोहे यांची पत्नी ठार
त्यांच्याकडून शिकारीकरिता वापरण्यात येणारे शिकंजे, इतर धारदार शस्त्रे, वाघांची ३ नखे व ४६ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. याचबरोबर करीमनगर, तेलंगणा व धुळे, महाराष्ट्र येथूनही संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या टोळीचा देशाच्या विविध भागातील शिकार प्रकरणांत समावेश असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विशेष कार्य दल करीत आहे.