चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाने तीव्र रूप धारण केले आहे. २०२१ ते २०२४ या चार वर्षांच्या काळात तब्बल ५९ वाघ आणि ३९ बिबट्यांचा मृत्यू झाला असून १४६ नागरिकांनीही जीव गमवला. यामुळे वाघाच्या स्थलांतरणाची मागणी जोर धरू लागली आहे.
व्याघ्रदर्शनासाठी प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे आहे. वाघ, बिबट्यांच्या संर्वधन व वाढीसाठी आवश्यक जैवविविधता, वन, पर्यावरण व अधिवास असल्याने वाघ व बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील जंगल मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर वनविभाग, ब्रम्हपुरी वनविभाग व वनविकास महामंडळ, अशा चार विभागात विभागले आहे. ब्रम्हपुरी वनविभागात सर्वाधित वाघ आहेत. त्यामुळे या वनक्षेत्रांत मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र आहे.
हेही वाचा : निवासी डॉक्टरांना नियमित विद्यावेतन देण्यात हलगर्जी
जिल्ह्यात २०२१ ते २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत ५९ वाघ आणि ३९ बिबट्यांच्या मृत्यूची नोंद झाली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १४६ नागरिकांनीही जीव गमावला. २०२१ मध्ये एकूण १२ वाघ आणि १३ बिबट्यांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये १२ वाघ आणि ७ बिबट्यांचा मृत्यू झाला. २०२३ मध्ये वाघ व बिबट्याच्या मृत्यूच्या वाढ होत २७ वाघ व १४ बिबट्यांचा मृत्यूची नोंद झाली. चालू वर्षांत आतापर्यंत ८ वाघ आणि ५ बिबट्यांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील वाघ व बिबट्यांची वाढलेली संख्या तिंचेचा विषय ठरत आहे. जंगलाबाहेर पडून रहिवासी भागात शिरणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार समोर येऊ लागली आहे. त्यामुळे वनविभागाला यावर तोडगा काढणे आवश्यक झाले आहे. वाघाचे स्थलांतरण करण्याशिवाय वनविभागासमोर दुसरा ठोस पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : अंत्यसंस्कारासाठी जमलेल्यांवर मधमाशांचा हल्ला; अनेक जखमी, ग्रामस्थांची पळापळ…
मानवी मृत्यूची आकडेवारी
- २०२१ ते २०२४ या चार वर्षांत वन्यजीवांच्या हल्ल्यात तब्बल १४६ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
- वाघांच्या हल्ल्यात १२४ नागरिकांनी, तर बिबट्यांच्या हल्ल्यात १७, रानडुकरांच्या हल्ल्यात ४ आणि हत्तींच्या हल्ल्यात एकाचा मृत्यूची नोंद आहे.
- २०२१ मध्ये ४३, २०२२ मध्ये ५१, २०२३ मध्ये २५, तर चालू वर्षात २०२४ मध्ये २६ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.