चंद्रपूर : जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी तब्बल ५७ हजार ३५७ शेतकऱ्यांची खाती देण्यात आली. मात्र, शासनस्तरावर निकषांतर्गत ६ हजार ४१८ कर्जदार सभासद अपात्र तर केवळ एकच वर्ष कर्जाची परतफेड करणाऱ्या १५ हजार ९२२ कर्जदार सभासदांना अपात्र ठरविण्यात आले असून एकूण २२ हजार ३५० शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सहकार विभागाला अपात्र झालेल्या सभासदांची यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये, लाभार्थी अपात्र का झाला, हे जाणून घेण्याचा अधिकार संबंधित लाभार्थ्यांना आहे. त्यामुळे अपात्र लोकांची यादी तातडीने प्रसिद्ध करावी, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार संबंधित यादी शासनाकडून प्राप्त करून घेण्यात आली असून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये तसेच सहायक निबंधक तालुका कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रोत्साहनपर लाभ योजनेला जुलै २०२२ मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अंतर्गत जिल्ह्यात चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेमार्फत ५७ हजार ३५७ कर्ज खाते पोर्टलवर अपलोड करण्यात आले.
हेही वाचा : वाशीम : भर वस्तीत मंदिरासमोर निर्घृण हत्या, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
अपलोड केलेल्या कर्जखात्यांपैकी ३६ हजार ६०८ कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला. यापैकी ३६ हजार १५२ कर्जदार सभासदांची आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांच्या खात्यात शासनामार्फत प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे १४५ कोटी १८ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम म्हणून जमा करण्यात आले आहे. शासनस्तरावर निकषांतर्गत अपात्र ठरविलेल्या ६ हजार ४१८ सभासदांची यादी तसेच फक्त एकच वर्ष कर्जाची परतफेड करणाऱ्या १५ हजार ९२२ अपात्र कर्जदार सभासदांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाली आहे. सदर यादी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये तसेच सहाय्यक निबंधक तालुका कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या संबंधित लाभार्थी सभासदांनी याबाबत नोंद घ्यावी. तसेच याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रशांत धोटे यांनी केले आहे.