चंद्रपूर : जिल्ह्यात डेंग्यू व टायफाईड आजाराने डोके वर काढल्याने रूग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रूग्णालय तथा खासगी हॉस्पीटल रूग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. खाटा कमी रूग्ण्संख्या जास्त अशी अवस्था आहे. शहरातील ख्रिश्चन कॉलनी सिंधीबन वाॅर्डात एमएससी झालेल्या ईशा विजय देविदास या अवघ्या २३ वर्षीय तरूणीचा शनिवारी डेंग्यूने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरात डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला असतांनाही महापालिकेचा आरोग्य विभाग निद्रावस्थेत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील वातावरणात होत असलेल्या प्रचंड बदलामुळे साथीचे आजार वाढले आहेत. तसेच डेंग्यू, टायफाईट, मलेरिया या रोगांनी डोके वर काढले आहे. शहरात घरामागे एकजण तापाने ग्रस्त आहे. डेंग्यू व टायफाईटने खासगी रूग्णालये तर हाऊसफुल्ल असून नव्या रूग्णांना भरती करून घेण्यास खासगी डॉक्टर नकार देत आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रूग्णालयात खाटा कमी व रूग्णसंख्या जास्त अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघत आहे. जिल्ह्यात नांदेड व नाशिकसारखी परिस्थिती होवू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रूग्णालयाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. राजकीय पक्षांनी रूग्णांना आवश्यक औषध पुरवठा व उपचार मिळावा यासाठी आंदोलने केली. मात्र, राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाही.
हेही वाचा : मनसेने काढली आरोग्य व्यवस्थेची अंत्ययात्रा…
अशातच शनिवारी खि्रश्चन कॉलनी परिसरातील सिंधीबन वॉर्डातील ईशा विजय देवीदास तरूणीचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे. ईशा हिला सर्वप्रथम चंद्रपूर येथील क्राईस्ट रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र नागपुरात तिने अखेरचा श्वास घेतला. चंद्रपूर महापालिकेच्या हद्दीत डेंग्यूने एक महिन्यापूर्वी मीत वानखेडे या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता, तर मनोज संभाजी श्रीरामे (२३, रा. इंदिरानगर वॉर्ड) या मुलाचा दहा दिवसांपूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ आता २३ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला असतांनाही पालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. वारंवार पालिकेकडून स्वच्छता मोहिम व धूर फवारणी केल्याचा दावा केला जातो. मात्र, अशा घटनामुळे पालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकूणच जिल्ह्यातील आरोग्य विभागाला कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे.