चंद्रपूर: बालविवाह प्रतिबंधात्मक अभियान येथे राबविण्यात येत आहे. परंतु, एकट्या मात्र चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षांत ४८ बालविवाह झालेत. यातील ४१ बालविवाह रोखण्यात यश आले. तर, ७ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला बालविवाहाचा शाप लागला काय अशीही चर्चा सुरू आहे. औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर मध्ये जिवती, कोरपना, पोंभूर्णा हे तीन ग्रामीण तालुके आहेत. शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात बालविवाह नित्याने होत असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षांत २ बालविवाह झालेत. चंद्रपूर आणि नागभीड तालुक्यात झालेले हे दोन्ही विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले असले, तरी या दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. २०२१-२२ मध्ये बालविवाहाची संख्या वाढली. पोंभुर्णा, मूल या तालुक्यात प्रत्येकी दोन, तर चंद्रपूर, सावली, वरोरा, जिवती आणि कोरपना तालुक्यात प्रत्येकी एक बालविवाह झाला. ९ बालविवाह रोखण्यात यश आले. मात्र, एकाही प्रकरणात प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही. २०२२-२३ मधील ७ बालविवाहांतील दोन प्रकरणे पोलिस ठाण्यात दाखल झाली. चंद्रपूर तालुका २, तर बल्लारपूर, मूल, चिमूर, गोंडपिपरी आणि नागभीड तालुक्यात प्रत्येकी एका बालविवाहाची नोंद प्रशासनाकडे आहे. २०२३-२४ मध्ये तब्बल १२ बालविवाह झालेत. यात चंद्रपूर ४, जिवती ४ आणि बल्लारपूर, मूल, वरोरा आणि राजुरा तालुक्यात प्रत्येकी एक बालविवाह झाला. यातील दोन प्रकरणांत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, २०२४-२५ मध्ये एकट्या जिवती तालुक्यात पाच बालविवाह झाले आहेत. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा, राजुरा आणि नागभीड तालुक्यात प्रत्येकी एक बालविवाह झाला. यातील राजुरा येथील प्रकरण पोलिस ठाण्यात दाखल झाले. एकूण १५ बालविवाह यावर्षात रोखण्यात प्रशासनाला यश आले. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील १३ तालुक्यात मागील ५ वर्षांत बालविवाह झाले आहेत. मात्र, भद्रावती आणि सिंदेवाही या दोन तालुक्यात बालविवाहाची एकही घटना घडलेली नाही, ही बाब समाधानकारक आहे. बालविवाहाच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत. यात १८ वर्षांच्या आतील बालिका शाळेत सतत गैरहजर राहत असतील, तर बालिकांच्या घरी गृहचौकशी करून अनुपस्थितीच्या कारणाची माहिती ग्रामसेवक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय तसेच शिक्षण विभागाला द्यावी, अशा सूचना जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.

शिक्षणाचा अभाव, गरिबी, दारिद्रय, अज्ञान, अनिष्ठ रुढी, परंपरांचा असलेला प|्रभाव यामुळे ग्रामीण भागात अजुनही बालविवाह होताना दिसत आहेत. बालविवाहाच्या घटनांसाठी जिवती तालुका हा हॉटस्पाट ठरत आहे. मागील दोन वर्षांत या एकट्या तालुक्यात ९ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास त्याबाबतची माहिती १०९८ या चाईल्ड हेल्पलाईनच्या मोफत हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांनी केले आहे.