नागपूर : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम आणि बॅलेटचा वाद सुरू झाला आहे. विरोधकांनी भाजपाचा विजय हा ईव्हीएममुळे झाल्याचा आरोप केला आहे, तर भाजपने हा संपूर्ण आरोप खोडून काढत ‘लाडकी बहीण योजना’ आणि जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचा विजय असल्याचे सांगितले आहे. असे असले तरी चंद्रपूर शहरामध्ये एक अभूतपूर्व सर्वेक्षण करण्यात आले, ज्यात तब्बल ९१ टक्के लोकांनी ईव्हीएमऐवजी बॅलेटवर विश्वास असल्याचे सांगितले. हा नेमका काय प्रकार होता, ते सविस्तर जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची झालेली मागणी देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. अशातच चंद्रपुरात कृषी महोत्सवात सहभागी ११ टक्के नागरिकांनी ‘आवाज जनतेचा’ या उपक्रमात इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर सर्व निवडणुका घ्याव्यात, अशी भूमिका एका चिठीद्वारे रविवारी नोंदवली. धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर, चंद्रपूरद्वारा २७ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत चांदा क्लब ग्राउंडवर ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांच्या संकल्पनेत हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हायला हव्यात का? असा प्रश्न नागरिकांना विचारण्यात आला होता. तीन दिवस चाललेल्या महोत्सवादरम्यानातील या उपक्रमात नागरिकांनी मत व्यक्त केलेली एक चिठ्ठी लिहून ती पेटीत टाकली. रविवारी चिठ्यांची मोजणी झाली. त्यामध्ये ९१ टक्के चिठ्ठ्या बॅलेट पेपरवरच निवडणूक घेण्याच्या बाजूने आढळून आल्या.

हेही वाचा – अमरावती : बँकांपेक्षा खासगी सावकारांकडूनच शेतकऱ्यांना कर्ज, तब्बल ९७.८१ कोटी…

या प्रक्रियेसाठी खुशाल काळे, प्रतीग एकोणकर, पुरुषोत्तम सातपुते, प्रा. एकोणकर, विशाल शेंडे, निखिल भडके, जया तिखट, तन्वी झाडे, वाल्मीक गुरनुले आदींनी सहकार्य केले. मतमोजणी अधिकारी म्हणून विलास माथनकर, अनिकेत दुर्गे, प्रलय म्हशाखेत्री, लुकेश पातले, रितेश जीवतोडे, प्रतीक बेरड, अनिल डहाके व कार्यकर्ते यांनी काम पाहिले. अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी निकालाची घोषणा केली. आयोजनासाठी ओबीसी सेवा संघाचे जिल्हा महासचिव विलास माथनकर व कृषी महोत्सव आयोजन समितीने सहकार्य केले.

हेही वाचा – “वैदर्भीय मुख्यमंत्री असताना अधिवेशन सहा दिवसांचेच होणे हे वेदनादायी”, विदर्भवाद्यांची खंत

या संपूर्ण प्रक्रियेमुळे नागरिकांचा ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर विश्वास असल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षानेही निवडणूक आयोगावर आक्षेप घेतले होते, तसेच काही तक्रारी केल्या होत्या. या सर्व तक्रारी आयोगाने खोडून काढत काँग्रेसला चांगलाच धक्का दिला होता. मात्र विविध शहरांत होत असलेल्या सर्वेक्षणातून लोकांचा बॅलेटवर अधिक विश्वास असल्याचे दिसून येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur 91 percent of citizens are in favor of ballot instead of evm what exactly happened dag 87 ssb