चंद्रपूर: जागतिक व्याघ्र दिनीच बल्लारशाह वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कळमना नियतक्षेत्र कक्ष क्रमांक ५७२ मधील सामाजिक वनिकरण रोपवाटीका कळमनाचे लगत कुकुडरांझीचे झुडपात एक चार वर्षाची वाघीण मृतावस्थेत मिळाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. शनिवार २९ जुलैच्या सकाळी कुकुडरांझीचे झुडपात एक पट्टेदार वाघ पडून असल्याची माहीती मिळाली.
माहिती मिळताच मध्य चांदा वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीमती श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, कळमनाचे क्षेत्र सहायक भगिरथ पुरी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वाघिण मृतावस्थेत पडून होती. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदण पोडचेलवार यांना पाचारण करण्यात आले व त्यांचे समक्ष सदर परिसराची पाहणी केली. सदर झुडपात असलेला वाघ वन्यप्राणी मृत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
हेही वाचा… नक्षलवादी ‘बिटलू’चे स्मारक तोडून गडचिरोली पोलिसांचे नक्षल सप्ताहाला प्रत्युत्तर; जवानांनी…
सदर प्रकरण नियतक्षेत्र कळमना अंतर्गत प्राथमिक वन गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर वाघ वन्यप्राण्याचे सर्व अवयव शाबुत असुन वन्यप्राण्याचे अंदाजे वय ४ वर्ष असुन लिंग मादी आहे. प्रकरर्णी मोकापंचनामा नोंदवुन वन्यप्राण्याचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले व शविच्छेदनासाठी ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपुर येथे नेण्यात आले. वन्यप्राण्याचे मृत्युचे खरे कारण शवविच्छेदनानंतर सांगता येईल. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.