चंद्रपूर: पाच वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात आशावर्कर, अंगणवाडीसेविकांच्या मानधनात वाढ केली होती. मात्र, अजूनही एक रुपयाची वाढ त्यांच्या मानधनात झाली नाही. मानधनात वाढ करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सोमवारी (ता. ११) अंगणवाडीसेविका, आशावर्करने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडीसेविका, आशावर्कर सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडीसेविकांना दीड हजार रुपये, तर आशावर्करला एक हजार रुपये वाढ देण्यात येईल, असे पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात सांगितले. मात्र, पाच वर्षांचा काळ लोटला तरी या महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक रुपयाही वाढ करण्यात आली नाही. गेल्या काही वर्षांत महागाई प्रचंड वाढली. सिलिंडरचे भाव हजारावर पोहोचले. जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली. मात्र, आशावर्कर, अंगणवाडीसेविकांच्या मानधनात एक रुपयाही वाढ झाली नाही. दुर्बल घटकांप्रती केंद्र सरकार उदासीन आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिटूच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मानधनात वाढ करावी, किमान वेतन लागू करावे, आशा, अंगणवाडी सेविकांना महिला कर्मचाऱ्यांचा दर्जा द्याव्या या घोषणा देण्यात आल्या.
हेही वाचा… रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : नागपूरमार्गे धावणाऱ्या ११ रेल्वेगाड्या रद्द, वाचा सविस्तर…
याप्रसंगी किशोर जामदार, प्रा. रमेशचंद्र दहीवडे, अरुण भेलके, राजेश पिंजरकर, प्रमोद गोडघाटे यांनी आपल्या भाषणात केंद्र, राज्य शासनाचा समाचार घेतला. शारदा लेनगुरे, सुलभा पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेजन देण्यात आले. यावेळी विद्या निब्रड, सुनंदा बावणे, गुजा डोंगे, प्रणिता लांडगे, सुरेखा तितरे, वंदना मुळे, सायली बावणे, शोभा कुरेकार, अभंगा चहांदे, प्रिया काकडे, प्रगती पेद्दीवार, संगीता नागपुरे, प्रतिभा राऊत यांची उपस्थिती होती.