चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आयुध निर्माणी व अधिकारी – कर्मचारी वसाहतीत बिबट्याच्या ‘कुणबा’ मुळे प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या कुणबाने चक्क एका आयुध निर्माणी अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाची भिंत ओलांडून तेथेच तळ ठोकला. काही वेळ थांबल्यानंतर पुन्हा भिंत ओलांडून पळ काढला. मादी बिबट्यासह तिचे तीन ‘शावक’ भिंत ओलाडतांनाची चित्रफीत एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली असून त्यानंतर हा व्हिडिओ समाजामाध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान, माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावले असून गस्तही वाढविली आहे. भद्रावती येथील आयुध निर्माणी चांदा येथील अधिकारी व कर्मचारी कॉलनी हा प्रकार घडला आहे. या कॉलनीत राहणाऱ्या एका व्यक्तीने बोलतांना सांगितले कि, ही चित्रफीत सेक्टर ६ येथील ऑफिसर कॉलनीच्या जॉइंट जनरल मॅनेजरच्या बंगल्याचा आहे. ही चित्रफीत सोमवारच्या रात्रीची आहे. आणि मंगळवारपासून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाघ, बिबट्या, अस्वल यांसारखे वन्यप्राणी येथे नेहमीच वावरत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, चार बिबटे एकत्र दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चित्रफीत व्हायरल झाल्याने या परिसरात वनविभागाने गस्त वाढविली असून बिबट्या कुठून येत आहे याचा तपास केला जात आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहे.
हेही वाचा…बुलढाणा : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
आयुध निर्माणी परिसरातून २ वर्षांत ९ बिबट्या पकडले
ताडोबाच्या जंगलाला लागून आयुध निर्माणी चांदा आहे. वाघ, बिबट्या, अस्वल यांसारखे वन्यप्राणी येथे अनेकदा दिसतात. मात्र संकुलात बिबट्यांची संख्या लक्षवेधी आहे. मागील दोन वर्षांत भद्रावती वनविभागाच्या पथकाने या संकुलातून सुमारे ९ बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे.