चंद्रपूर : सावली तालुक्यातील दाबगाव मौशी येथील उच्चशिक्षित युवकाचा युरोपातील ऑस्ट्रिया देशातील युवतीशी प्रेमविवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. युवतीला थेट गावात आणून बैलबंडीतून वरात काढत अतिशय साध्या पद्धतीने विवाह केला. या अनोख्या प्रेमविवाह सोहळ्याची जिल्ह्यातभरात होत असून चित्रफिती समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्याला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्तेष्ट सहभागी झाले होते.
हेही वाचा : खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात, “पूर्वी मुख्यमंत्र्यांचे ‘दूर’दर्शन, आता मात्र…”
आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या सुकरू पाटील आभारे यांचा एकुलता एक मुलगा हेमंत उच्च शिक्षित असून विदेशातील एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याचे ऑस्ट्रिया देशातील युडीश हरमायनी प्रित्झ, रा. बियेना ऑस्ट्रिया या युवतीशी प्रेमसंबंध जुळून आले. दरम्यान, दोघांनीही लग्न करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी थेट आपले गाव गाठले. आईवडिलांच्या परवानगीनंतर लग्नाची तारीख ठरविण्यात आली. मात्र, गावात समारंभ युक्त सभागृह नसल्याने थेट स्वतःच्या शेतातच लग्न करण्याचे ठरले. कोणताही मंडप किंवा बडेजावपणा न करता शेतातील एका झाडाखाली लग्नविधी सामाजिक रीतिरिवाजाप्रमाणे पार पाडण्यात आला. आधुनिक युगात नावीन्यपूर्ण आणि दिखाऊपणाचा बाज न आणता जुन्या पद्धतीच्या बैलबंडीने वाजतगाजत वरात काढण्यात आली होती. या समारंभाला अमेरिका, स्पेन, दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रियासह नऊ देशांतील वधूचे आप्तेष्ट उपस्थित होते.
हेही वाचा : अभिनेत्री सायली संजीव म्हणते, मला शेतकरी नवरा हवा…
बैलबंडीने निघालेल्या वरातीत विदेशातून दाखल झालेल्या पाहुण्यांनी डिजे, बॅन्डच्या तालावर नृत्यृ, डान्स केला. चंद्रपूरच्या सावलीतील युवकांने थेट युरोपातील आस्ट्रिया येथील विवाह केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून या विवाह सोहळ्याच्या चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाली आहे. जागतिक प्रेमदिनाच्या दोन दिवस पूर्वीच हा विवाह सोहळा अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. लग्नपत्रिकेपासून तर मंगलाष्टके, हळद, संगीत व विवाह समारंभातील सर्व आवश्यक कार्यक्रम भारतीय पध्दतीने येथे पार पडले. विदेशी पाहुणे भारतीय पध्दतीने साजरे होणारे लग्न बघून आनंदीत झाले.