चंद्रपूर : मोदी सरकारने २०१४ मध्ये अर्थव्यवस्थेची चावी हाती घेतली तेव्हा भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात १० व्या क्रमांकावर होता. मात्र, आता भारताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी झेप घेतली आहे. आज जगात भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची असेल, अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी दिली.
वरोरा तालुक्यातील खेमजई येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विनय गौडा, सीईओ विवेक जॉन्सन, पोलीस अधिक्षक रवींद्रसिंग परदेशी, भारत पेट्रोलियमचे अधिकारी उपस्थित होते.
पुरी म्हणाले, २०१४ मध्ये १४ कोटी गॅस जोडणी होती, मोदी सरकारच्या काळात वाढून ३२ कोटीवर पोहोचली आहे. मागील सरकारने राजीव गांधी आवास योजनेत केवळ ४ हजार घरे बांधली. मात्र, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत देशभरात ४ कोटी घरे मंजूर झाली आहेत. ५० कोटी नागरिकांचे बँकेत जन-धन खाते उघडण्यात आले आहे. १३ कोटी नागरिकांना केंद्रीय योजनेतून पाणीपुरवठा होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये केवळ १०२ पेट्रोल पंप होते ते आता वाढून १३१ वर पोहोचले आहे. गॅस वितरक केवळ ३७ होते ते वाढवून ५४ करण्यात आले आहे. २०१४ मध्ये ३ लाख ३४ हजार असलेले गॅस जोडणी आत ६ लाख ५२ हजार झाली आहे. यामध्ये उज्वला योजनेतून तब्ब्ल ३४ हजार ५९५ नवीन गॅस जोडणी देण्यात आली आहे.
हेही वाचा : हनुमान चालिसाला विरोध केला, त्यांचे लंकादहन झाले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून मिशन ऑलिम्पिक, मिशन जयकिशनची सुरुवात करीत असल्याचे सांगितले. अयोध्येतील मंदिरात लागलेले सागवान चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती त्यांनी दिली. वाघाचा जिल्हा असल्याने विकसित भारत या संकल्पनेत चंद्रपूरचा मोठा संकल्प राहील, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले. यावेळी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचेही भाषण झाले.
हेही वाचा : “…तर अजित पवारांना बरोबर घेतलेच नसते”, विनोद तावडेंचं विधान
पंतप्रधान मोदींचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधन
विकसित भारत संकल्प यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे संबोधित केले. यावेळी त्यांनी वरोरा तालुक्यातील खेमजई या गावातील महिलांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांची आस्थेने विचारपूस करीत सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामीण महिलांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.