चंद्रपूर : शिवसेनेच्या (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) गटात काल रविवारी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात तुफान राडा झाला. मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या साध्या वेशातील पोलिसांनाही यावेळी धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. दरम्यान, दोन्ही गटांवर पोलिसांनी गु्न्हा दाखल करून रात्री १२ वाजताच्या सुमाराला गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना जामीनावर सोडण्यात आले.
अलिकडेच मनसेतून शिवसेनेच्या (शिंदे) गटात सामील झालेल्या प्रतिमा ठाकूर यांचा वीस वर्षीय मुलगा एका खासगी शिकवणी वर्गातील मुलांचे आपसातील भांडण सोडविण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याला तिथे मारहाण करण्यात आली. शिवसेनेच्या (ठाकरे) गटाचे स्वप्नील काशिकर यांनी त्याला आपल्या कार्यालयात बसवून ठेवले. त्याला सोडविण्यासाठी भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर हे सहकाऱ्यांसोबत काशिकर यांच्या कार्यालयात गेले. काशिकर आणि ठाकुर, गुप्ता यांचा जुना वाद असल्याने मुलाला बसवून ठेवल्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला आणि त्यांच्या शाब्दीक बाचाबाची झाली.
हेही वाचा : ‘मी संविधानाची शपथ घेतो, जे बोलेन ते…’, निवृत्त अधिकारी न्यायालयात असे का म्हणाले? वाचा सविस्तर…
दरम्यान प्रकरण इतके वाढत गेले कि, एकमेकांना त्यांनी मारहाण केली. त्यानंतर दोन्ही गट थेट शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. काशिकर आणि ठाकुर, गुप्ता यांना आणखी आपले सहकारी पोलिस ठाण्यात बोलविले. तिथे दोन्ही गटांत प्रचंड झोंबाझोंबी होवून एकमेकांना मारहाण केली. ही मारहाण सोडविण्यासाठी साध्या वेशातील पोलिस मध्ये पडले. मात्र, साध्या वेशातील पोलिसांनाही त्यांनी धक्काबुक्की केली. दोन गटात तुबंळ हाणामारी होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार हे पोलिस ताफ्यासह शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागण्याने शेवटी पोलिसांना लाठीहल्ला करून कार्यकर्त्यांना पांगवावे लागले.
हेही वाचा : हे काय! झिम्बाब्वेतील झाडे चक्क बोलायला लागली, महाराष्ट्रातील प्राध्यापकाची किमया
दरम्यान, शहर पोलिसांनी काशिकर, गुप्ता, ठाकूर यांच्यासह काही कार्यकर्त्यांवर भादंवी ३५३ सह अन्य कलमांतर्गत गु्न्हा दाखल केला. त्यांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी केल्या. त्यानंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास पोलिसांकडून सूचना पत्रावर जामीन देण्यात आला. या घटनेची चर्चा सर्वत्र होत आहे.