चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या चर्चात्मक कार्यक्रमात ‘दारू’चा विषय छेडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल व भाजप कार्यकर्ते आपसात भिडले. यामुळे या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे जयस्वाल जिल्ह्यातील मोठे दारू व्यावसायिक आहेत.
चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदार संघात १९ एप्रिल रोजी मतदान आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार व महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात काट्याची लढत आहे. पहिल्याच टप्प्यात मतदान असल्याने सर्व प्रसार माध्यमांचे लक्ष या हेविवेट लढतीकडे लागले आहे. विविध इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांच्या वतीने येथे संवादात्मक, चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. शनिवारी सायंकाळी येथील रामाला तलाव परिसरात मुंबई तक या माध्यमाच्या वतीने अशाच एका चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, रिपाई, बसप, वंचित बहुजन आघाडी तसेच इतरही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निमंत्रित केले होते. चंद्रपूर लोकसभा मतदार संघावर चर्चा सुरू असतानाच कुणीतरी “दारू ” चा विषय छेडला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल चांगलेच भडकले. दारू हा विषय चर्चेत आणू नका अशी विनंती जयस्वाल यांच्यासह भाजपचे माजी ग्रामीण अध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे दिलीप चौधरी यांनी केली. मात्र त्यानंतर वातावरण आणखी बिघडले व जयस्वाल आणि भाजप कार्यकर्ते आपसात भिडले.
हेही वाचा…“काम बरोबर नाही, आत्ताच सावध व्हा,” चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला दिला इशारा; वाचा…
यावेळी जयस्वाल याचा राग अनावर झाला व त्यांनी एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण केली. त्यानंतर भाजप कार्यकर्ते देखील जयस्वाल यांच्यावर धावून गेले. हा वाद शांत करण्यासाठी चौधरी, भोंगळे व पावडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीच ऐकायला तयार नव्हते. शेवटी वादावादीनंतर कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. या निवडणुकीत दारू हा विषय चर्चेत आणू नये अशी विनंती यापूर्वीच एका मोठ्या दारू विक्रेत्याने जिल्ह्यातील सर्व दारू विक्रेत्यांना केली आहे. मात्र त्यानंतरही माध्यमांच्या चर्चेत दारू हा विषय चर्चेत आल्याने चांगलेच वादळ उठले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांचा दारू व्यवसाय आहे. याचा महिलांच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो असेही बोलले जात आहे.