चंद्रपूर : महाकाली महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणारच असे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या महोत्सवाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनी येण्याचे टाळले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या न येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी २०२२ पासून महाकाली महोत्सवाची सुरुवात केली. आमदार जोरगेवार यांनी गेल्या वर्षी महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असे सांगितले होते. मात्र काही राजकीय कारणामुळे दोन्ही नेते येऊ शकले नव्हते. त्यामुळे १९ ऑक्टोंबर ते २३ ऑक्टोंबर २०२३ या पाच दिवसीय महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस येणारच अशी माहिती आमदार जोरगेवार यांनी पत्रपरिषदेत दिली होती.
हेही वाचा : फूट पाडणाऱ्यांपासून सावध राहा! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन
मात्र या दोन्ही नेत्यांनी सलग दुसऱ्या वर्षी या महोत्सवाला येण्याचे टाळले आहे. या दोन्ही नेत्यांच्या महोत्सवाला न येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. त्याला कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून संपूर्ण शहरात स्वागताचे बॅनर, पोस्टर, स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या. वरोरा नाका पासून ते महाकाली मंदिर परिसर पर्यंत स्वागताचे फलक मध्यरात्री लावण्यात आले. मुख्यमंत्री काही कारणाने येणार नाही मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणारच असे वातावरण तयार करण्यात आले होते.
हेही वाचा : दीक्षाभूमीच्या विकासासाठी २०० कोटी, जागतिक पातळीवर विकास- फडणवीस
मात्र कुठून राजकारणाची चक्रे फिरली की मध्यरात्री १२ वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री येणार असे सांगणारे पोलिस दलाचे अधिकारी देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा रद्द झाला असे सांगत होते. आमदार जोरगेवार यांच्या अतिशय जवळच्या व महोत्सव समितीच्या एका पदाधिकाऱ्याने तर चार्टर प्लेन तयार ठेवले होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री चंद्रपूरच्या दिशेने निघणार तेव्हाच विमानात बिघाड झाला. त्यामुळे दोन्ही नेते महोत्सवाला येऊ शकले नाही असे सांगितले.
हेही वाचा : विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार, शिर व तीन पंजे गायब
एकूणच कुठेतरी राजकारण शिजले आणि या दोन्ही नेत्यांनी महोत्सवाला येण्याचे टाळले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे ओबीसी समाजाचे रवींद्र टोंगे यांचे उपोषण सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी ९.३० वाजताच चंद्रपूर येथे आले होते. उपोषण सोडविण्यासाठी येऊ शकतात तर महोत्सवाकडे का पाठ फिरवली अशीही चर्चा आहे.