चंद्रपूर : स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले नसताना आणि भूसंपादनाचा निर्णय झालेला नसताना भद्रावती येथे अरविंदो रियॅल्टी इंन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने खाणीतून कोळसा उत्खननासाठी पाणी काढणे सुरू केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शुक्रवारी मोर्चा काढून कोळसा काढण्यास तीव्र विरोध केला आहे. भद्रावती तालुक्यातील टाकळी-जेना-बेल्लोरा उत्तर आणि दक्षिण कोळसा खाणीचा पट्टा अरविंदोला मिळाला आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांशी कोणतीही चर्चा न करता अरविंदोने २२ लाख रुपये एकरी देण्याची घोषणा केली. तसेच माध्यमांमध्ये प्रकल्पग्रस्तांशी ऐतिहासीक करार केल्याच्या बातम्या प्रकाशित करून जिल्हा प्रशासनासह गावकऱ्यांची दिशाभूल केली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीने सारवासारव करण्यास सुरुवात केली. या खाणीमुळे बाधित होणाऱ्या सहा गावातील नागरिकांनी एकत्र येत विरोध केला. त्यानंतर प्रशासकीय स्तरावर अरविंदो आणि गावकऱ्यांच्या बैठका झाल्या. मात्र, भूसंपादन आणि नोकरीचा प्रश्न सुटू शकला नाही. त्यापूर्वीच या खाणीच्या मध्यभागी अस्तित्वात असलेल्या जुन्या डागा कोळसा खाणीतून पाणी बाहेर काढणे प्रारंभ केले. त्यामुळे या क्षेत्रातील गावात नाल्याना पूर आला आहे. या अरबिंदो निर्मित पुरामुळे शेतमाल काढणे अवघड झाले असून शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर वारंवार विचारणा करूनही कंपनी मौन आहे.
हेही वाचा : मानवी तस्करी, गुलामगिरीविरोधात यवतमाळात ‘वॉक फॅार फ्रिडम’
प्रकल्पग्रस्तांशी संवाद न साधता खाणकाम सुरू केल्याने प्रकल्पग्रस्तानी आज मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. अरबिंदो खाण कंपनीने स्थानिक नागरिकांमध्ये नुकसानभरपाईवरून फूट पाडल्याचे या मोर्चात उघड झाले. आंदोलक ग्रामस्थ कंपनीला सहाय्य करण्याचा मुद्यावरून आपसातच भिडले. दरम्यान, अरविंदोचे सहाय्यक व्यवस्थापक हक यांनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा : विभागीय बैठकीत गोंधळ घालणारे नरेंद्र जिचकार यांच्या हकालट्टीचा शहर शिस्तपालन समितीचा ठराव
“‘अरविंदो’ने खाणीतून पाणी काढणे सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्यांनी प्रशासनाकडे तक्रारी कराव्यात. कुणाच्या तक्रारी अद्याप आल्या नसल्या तरी वानखेडे नावाच्या एका व्यक्तीची तक्रार आहे. पाणी सोडल्यामुळे त्याच्या शेतीचे नुकसान झाले आहे. इतर तक्रारी आलेल्या नाहीत. तक्रारी मिळाल्या तर ग्रामस्थांची बाजू ऐकून घेतली जाईल”, असे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनयकुमार गौड यांनी म्हटले आहे.