चंद्रपूर: विधानसभा निवडणुकीत मतदार संघाच्या दावेदारी वरून या जिल्ह्यात महाविकास आघाडीत दावेदारी सुरू झाली आहे. शिवसेना( ठाकरे) पक्षाने विधानसभेच्या तीन जागा मागितल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षाने बल्लारपूर विधानसभा मतदार संघासह तीन जागा पक्षाकडे मागितल्या आहेत. मात्र आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाला एकही जागा न सोडता जिल्ह्यातील सर्व सहा जागा काँग्रेस पक्ष लढणार असे सांगत प्रदेश प्रभारी यांच्याकडे सहाही जागा काँग्रेस लढणार असा आग्रह धरल्याने आघाडीत बिघाडीची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे तशी मागणी केली आहे. काँग्रेस जिल्ह्यातील सहाही जागा लढणार असा आग्रहच धोटे यांनी केला आहे. या बेठकीला खासदार प्रतिभा धानोरकर आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. या बेठकीत जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षाच्या मजबूत स्थितीचा अहवाल सादर केला. जिल्हात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सहाही जागा लढविल्या होत्या आणि त्यापैकी राजुरा, ब्रम्हपुरी व वरोरा या तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते तर सध्यास्थितीत जिल्हात काँग्रेसला अतिशय अनुकूल वातावरण आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, ब्रम्हपुरी व चिमूर या सहाही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतांची मोठी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष जिल्ह्यात खूप जास्त मजबूत असल्याने या सहाही विधानसभा काँग्रेसनेच लढवाव्यात अशी भक्कम भुमिका मांडली. यावर मंथन होऊन कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या भुमिकेला हिरवा झेंडा दाखविला आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्य़ातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचेच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चित झाले असून जिल्हातील या सहाही विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आणि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे.
हेही वाचा : चंद्रपूर: सरकारी आणि वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण काढा; न्यायालयाचे आदेश धडकताच…
दरम्यान आमदार धोटे यांनी सहाही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे यांनी बल्लारपूर मधून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. तर दुसरे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी भद्रावती – वरोरा या मतदार संघात जनसंपर्क वाढवीत उमेदवारीवर दावा केला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना देखील काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी बल्लारपूर विधानसभा मतदार संघात मागील ३० वर्षापासून काँग्रेस पक्ष पराभूत होत आला आहे. तेव्हा आता काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी द्यावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटला नाही तर पक्षाचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील असा इशारा वैद्य यांनी पक्ष निरीक्षक दिलीप पनकुले तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघावर रिपब्लिकन पक्ष (खोब्रागडे) यांनी दावा केला आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळू खोब्रागडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. खोब्रागडे गट हा महाविकास आघाडीत सहभागी आहे. येथे काँग्रेसने खोब्रागडे यांना उमेदवारी दिली नाही तर आंबेडकरी मतदार तीव्र नाराज होईल. त्याचा परिणाम जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघावर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे काही लोकप्रतिनिधी वादग्रस्त सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अंभोरे यांचे नाव समोर करीत असल्याने गेल्या अनेक वर्षापासून पक्षासाठी काम करणारे, निष्ठावंत काँग्रेसी दुखावले आहेत. त्याचाही परिणाम काँग्रेस पक्षाला विधानसभेत होईल अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.