चंद्रपूर: विदर्भात भाजपने वर्धा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रामदास तडस हा तेली समाजाचा उमेदवार दिला. आता काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तेली समाजाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी समोर आली आहे. विशेष म्हणजे, तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विनायक बांगडे व प्रकाश देवतळे या दोघांनी लोकसभेची उमेदवारी मागीतली होती. ही दोन्ही नावे मुंबईतच कापण्यात आल्याने रोष व्यक्त होत आहे.
हेही वाचा : संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणतात, “शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकतेचा प्रयत्न…”
काँग्रेसने अजूनही लोकसभेचे उमेदवार जाहीर केले नाही. तेव्हा चंद्रपूरची लोकसभेची जागा तेली समाजासाठी सोडावी, अशी मागणी देवतळे यांनी प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याकडे केली आहे. काँग्रेसचे उमेदवार जाहीर होण्यास दोन दिवस आहेत. या दोन दिवसात काँग्रेसने निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवण्यास मोकळे आहोत, असाही इशारा देवतळे यांनी दिला आहे.