चंद्रपूर : देशाचे संविधान असो की महापुरुषांचे लेखन… ते आपल्या सोयीनुसार बदलून घेणे हा भाजप आणि मित्रपक्षांचा अजेंडाच आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. नाशिक येथे नुकतेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी केले. या स्मारकावर महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या ओळी अंकित करण्यात आल्या. पण, आपल्या सोयीनुसार काही ओळी जाणीवपूर्वक वगळल्या. काहींमध्ये सोयीचा बदल केला असा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विद्येविना मती गेली,

मतीविना नीती गेली,

नीतीविना गती गेली,

गतीविना वित्त गेले,

वित्ताविना शूद्र खचले,

इतके अनर्थ एका अविद्येने केले!

हेही वाचा : राजकीय नेते जगाला मागदर्शन करतात, मात्र स्वत: काहीच….गडकरींनी पुन्हा टोचले कान….

महात्मा ज्योतिबा फुले यांनी या सहा ओळींमधून शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यांच्या या संदेशानंतर समाजात बदल घडला. त्याचा परिणाम आज दिसून येत आहे. राज्यातील महायुती सरकारला महात्मा फुले यांचे हे विचार मान्य नाहीत, असाच प्रश्न पडायला लागला आहे. ‘वित्ताविना शूद्र खचले’ ही ओळच वगळण्यात आली. तर ‘गतीविना वित्त गेले’ ही ओळ बदलून ‘गती विना वित्त खचले’ अशी करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे लिहिले त्यातून काही ओळी वगळण्याचा, बदलण्याचा अधिकार या सरकारला कुणी दिला? महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत भाजपने ठरवून महापुरुषांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आता नाशिकमधली ही खाडोखोड. सततच्या या घटनांमुळे या सरकारचे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवरचे बेगडी प्रेम उघड झाले आहे. जनतेला यांचा डाव कळून चुकला आहे असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.