चंद्रपूर : महायुती सरकारमध्ये सहभागी आमदार किशोर जोरगेवार यांची महविकास आघाडीमध्ये सहभागी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी भेट घेतली. महायुतीच्या स्थानिक उमेदवाराकडून जोरगेवार यांना निमंत्रण मिळत नसताना महाविकास आघाडीच्या आमदाराने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. अशातच भाजप व काँग्रेस कडून अनेकांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुतीत सहभागी स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे चंद्रपूर विधानसभा मतदार संघात वर्चस्व आहे. ७५ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने अपक्ष राहून त्यांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत डावलून चालणार नाही हे महायुती व महाविकास आघाडी या दोघांनाही माहिती आहे.
महायुतीने येथे भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. तसेच महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार, जाहीर सभा सुरू झाल्या आहेत. मात्र महायुतीचे उमेदवार अथवा महायुतीच्या नेत्यांनी आमदार जोरगेवार यांच्याशी अजूनही संपर्क साधला नाही तसेच महायुतीच्या जाहीर सभा, कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही. नेमकी हीच संधी साधून महाविकास आघाडीत सहभागी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी शनिवारी आमदार जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
ही भेट युनायटेड किंगडम सरकारचे फॉरेन, कॉमनवेल्थ आणि डेव्हलपमेंट ऑफिस एशिया पॅसिफिकचे राजकीय आणि द्विपक्षीय वार्ताकार प्रमुख जॉन एम निकेल यांच्यामुळे झाली. यावेळी धोटे व जोरगेवार यांच्यात बरीच चर्चा झाली. जोरगेवार यांनी ही भेट मैत्रीपूर्ण असल्याचे सांगितले. आम्ही बऱ्याच वर्षापासून मित्र आहोत. या मित्रत्वतूनाच धोटे घरी आले होते असे माध्यमांशी बोलताना जोरगेवार म्हणाले. तर या भेटीत जोरगेवार यांच्याशी बरीच चर्चा झाली. या चर्चेतील सर्वच गोष्टी तुम्हाला सांगता येणार नाही असेही धोटे म्हणाले. त्यामुळे या भेटीला राजकीय महत्त्व आले आहे.
हेही वाचा : बेपत्ता भावंडांचे मृतदेह डोहात आढळले
विशेष म्हणजे १२ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या भेटीत जोरगेवार यांनी बोटेनिकाल गार्डनच्या लोकार्पण सोहळ्यात चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील चंद्रपूर महापालिकेच्या 816 कोटीच्या दोन कामांचे भूमिपूजन केले. मात्र स्थानिक आमदार म्हणून दोन मिनिट भाषण करण्याची संधी दिली नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार धोटे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.