चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात अब की बार ४०० पार नाही तर “साऊथ मे भाजपा साफ, नॉर्थ मे भाजपा हाफ ” हा नारा देशात सुरू आहे. देशात भाजप १८० पेक्षा अधिक जागा जिंकणार नाही असे प्रतिपादन खासदार इमरान प्रतापगडी यांनी केले. न्यू इंग्लिश हायस्कूलचे क्रीडांगणावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ खासदार इमरान प्रतापगडी यांची सभा झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंचावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, शहर अध्यक्ष रितेश तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, आप पदाधिकारी सुनील मुसळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रतापगडी म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर भाषण देताना पतीची आठवण झाली की डोळ्यात अश्रू आले. मात्र भाजप उमेदवार मुनगंटीवार यांनी काँग्रेस उमेदवार रडून मत मागत आहे अशी टीका केली. प्रतिभा धानोरकर यांचे अश्रू गंगा जल सारखे पवित्र अश्रू आहेत. तुम्ही प्रतिभा धानोरकर यांच्या अश्रुची तपासणी करून घ्यावी तिथे तुम्हाला प्रामाणिक पणाच दिसेल असे प्रतापगडी म्हणाले.

हेही वाचा : “निवडून येण्याची गॅरंटी नाही, मग जनतेला कसली गॅरंटी देताहेत,’’ संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले…

या निवडणुकीत तुमचे मत इंडिया आघाडीला हवे आहे. इंडिया आघाडीला मत म्हणजे. प्रतिभा धानोरकर यांना मत. प्रतिभाला मत म्हणजे दिवंगत बाळू धानोरकर यांना मत आणि कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मोहब्बत के मसिहा राहुल गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी यांना व देशाला मत आहे असेही प्रतापगडी म्हणाले. सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांची अशी अमर्यादित भाषा योग्य नाही. राजकारणात अशी भाषा योग्य नाही. मतदारांनो मतातून या अमर्यादित भाषेचे उत्तर देण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १५ लाखाच्या जुमल्यानंतर आता अब की बार ४०० पार चा नवीन जूमला घेऊन आले आहेत तेव्हा या जुमल्या पासून सावध राहण्याचे आवाहन प्रतापगडी यांनी केले.

हेही वाचा : रश्मी बर्वे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे शिवसेनेपुढे आव्हान; रामटेक लोकसभा मतदारसंघाचे चित्र

प्रतिभाताई रडून मत मागत आहे अशी टीका भाजप उमेदवार करीत आहेत. मात्र लोकसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रत्येक शब्दावर अश्रू ढाळत असतात, प्रत्येक वेळी भाऊक होतात त्याचे काय ? मोदी नेता नाही तर अमिताभ यांच्या पेक्षा श्रेष्ठ अभिनेता आहे. म्हणूनच त्यांना हे सर्व जमत असेही प्रतापगडी म्हणाले. इंडिया आघाडीचे केंद्रात सरकार येताच शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करू असेही ते म्हणाले. एक तेरे जाणे से सरा शहर खाली हो गया असे म्हणत प्रतापगडी यांनी दिवंगत खासदार धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ये कैसा अमृत काल है. इथे चौकीदार चोर आहे असे म्हणत देशात नवीन इंग्रज आले आहेत. तेव्हा आम्ही नवीन गांधी बनवू असेही प्रतापगडी म्हणाले. भाषणाच्या शेवटी धानोरकर यांच्या दोन्ही मुलांना सोबत घेत मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले. यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी भाषणात मोदी सरकार व महायुती सरकार कशा पद्धतीने महागाई, बेरोजगारी या मुद्यांवर बोलत नाही. भाजपच्या जाहीर नाम्यात याला स्थान नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र वैद्य यांनीही भाषणातून मोदी सरकारवर सडकून टीका केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur congress mp imran pratapgarhi lok sabha campaign for pratibha dhanorkar and criticizes bjp rsj 74 css