चंद्रपूर : घोडाझरी तलाव येथे तीन पाणी पुरवठा योजना आल्या आहेत. या योजनेसाठी कंत्राटदाराने मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. हा धोकादायक खड्डा तातडीने बुजविण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केल्यानंतरही कंत्राटदाराने काहीच केले नाही. उलट कंत्राटदार अरेरावी करीत आहे. कंत्राटदाराच्या या निष्काळजीपणामुळेच चिमूर तालुक्यातील पाच मुलांना जीव गमवावा लागला असा आरोप कॉग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान या तलावात मागील काही महिन्यात पंधरा लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृत्यूला कंत्राटदारच जबाबदार आहे ,असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला.
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून घोडाझरी तलावात मृत पावलेल्या पाच तरूणांचा मृत्यू कंत्राटदाराच्या चुकीमुळे झाल्याचे म्हटले आहे. घोडाझरी तलावात पोहण्याचा आंनद घेण्यासाठी चिमूर तालुक्यात येणाऱ्या साठगाव-कोलारी गावातील पाच तरुण शनिवारी दुपारच्या सुमारास गेले होते.जनक गावंडे , यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे या पाच जीवलग मित्रांनी पोहण्यासाठी तलावात उडी घेतली.पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मित्र बुडाले. पाच तरूणांच्या मृत्यूची ही घटना काळजाला चटका लावणारी आहे.
घरातील तरुण मुलांचा मृत्यू हे त्या कुटुंबासाठी दुःखद आहे. याच तलावात याआधी नागपूरच्या तरुणांचा देखील मृत्यू झाला आहे. तीन पाणीपुरवठा योजना आल्याने कंत्राटदाराने या तलावात खड्डा खोदून ठेवला आहे. हा खड्डा बुजवावा अशी विनंती लोकप्रतिनिधी यांनी केली.पण कंत्राटदाराने काहीच केले नाही उलट त्याची अरेरावी सुरू आहे. त्यामुळे हा खड्डा बुजवावा, अशी मागणी विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
या तलावात काही महिन्यात १५ तरुणांचा मृत्यू झाला ही घटना गंभीर आहे. शासनाने याची दखल घेऊन निवेदन द्यावे असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.कंत्राटदाराच्या चुकीमुळे या तलावात सातत्यने मृत्यू होत आहे असाही थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला. तेव्हा खड्डा बुजवण्यात यावा आणि कंत्राटदारावर कारवाई करावी अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.