चंद्रपूर : मुल येथील सहजिल्हा निबंधक कार्यालयात कार्यरत उपनिबंधक वैशाली वैजनाथ मिटकरी यांना १० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. मूल तालुक्यातील मारोडा येथील रहिवासी असलेल्या व वकील म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित तक्रारदाराला त्याची शेतजमीन दुसऱ्याला विकण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी स्थानिक व्यक्तीने संपर्क साधला होता.
हेही वाचा : धक्कादायक! बांधकाम मजुराच्या डोक्यातून लोखंडी सळई आरपार…
या कामासाठी मूल निबंधक कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने या जमिनीची कागदपत्रे उपनिबंधकांकडे दाखल केल्याचे सांगण्यात येते. या कामासाठी वैशाली मिटकरी यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली होती, हे प्रकरण १० हजार रुपयांवर मिटवण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून द्वितीय निबंधक वैशाली मिटकरी यांना रंगेहाथ अटक केली.