चंद्रपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ७५ व्या वर्षात पदार्पणानिमित्त राज्य शासनाने १६ ऑगस्ट २०२२ पासून ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना म.रा. परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येते. गत वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यातील ७५ वर्षांवरील १० लक्ष २६ हजार ११ ज्येष्ठ नागरिकांनी लालपरीने मोफत प्रवास केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजही ‘लालपरी’ ही ग्रामीण भागातील मुख्य जीवनवाहिनी मानली जाते. केवळ तालुक्याच्याच ठिकाणी नव्हे तर शेवटच्या गावखेड्यापर्यंत एस.टी. महामंडळाची बस पोहोचली असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने बसने प्रवास करीत असतात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, चिमूर आणि वरोरा असे चार आगार आहेत. सप्टेंबर २०२२ ते मे २०२३ या ९ महिन्यांत चारही आगार मिळून एकूण १० लक्ष २६ हजार ११ नागरिकांनी (७५ वर्षांवरील) अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेऊन मोफत प्रवास केला आहे. यात चंद्रपूर आगारातील २ लक्ष ७२ हजार ५७६ नागरिक, राजुरा आगारातील १ लक्ष ८५ हजार ४१३, चिमूर आगारातील ३ लक्ष ३८ हजार ४१६ आणि वरोरा आगारातील २ लक्ष २९ हजार ६०६ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५० टक्के प्रवास सवलत तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी १०० टक्के प्रवास सवलत लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा – पूर्व विदर्भातील सर्वाधिक ‘डेंग्यू’ग्रस्त नागपूर जिल्ह्यात; गोंदिया, गडचिरोलीतही रुग्णवाढ

या सवलतीकरीता संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र, राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र व रा.प. महामंडळाद्वारे देण्यात येणारे स्मार्टकार्ड, डीजीलॉकर, एम.आधार ही कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतात. वयाचा योग्य पुरावा असताना कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला सवलत नाकारण्यात येऊ नये, अशा सक्त सूचना सर्व वाहकांना देण्यात आल्याचे रा. परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सूतवणे यांनी कळविले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur district 10 lakh 26 thousand senior citizens traveled free by st bus in nine months rsj 74 ssb
Show comments