चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत रोकड, दारू, ड्रग्ज व इतर बाबी मिळून एकूण २ कोटी ९० लक्ष रुपयांचा ऐवज जप्त केला, अशी माहित जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.यात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात १६ लक्ष ३० हजार, ब्रम्हपुरी -५४ लक्ष ३९ हजार, चंद्रपूर- ४३ लक्ष, चिमूर- १९ लक्ष ८८ हजार, राजुरा -२४ लक्ष ६७ हजार आणि वरोरा- मतदारसंघात १ कोटी ३२ लाखांच्या जप्तीचा समावेश आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
हे ही वाचा… Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले ?
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी ३ ने वाढली होती, विधानसभा निवडणुकीमध्ये ही टक्केवारी आणखी वाढण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सायकल रॅली, रन फॉर व्होट, पोस्टर्स, रिल्स, निबंध, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धासुध्दा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार तसेच ज्येष्ठ मतदारांच्या मदतीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मुलभूत सुविधा पुरविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात १६ पेक्षा जास्त उमेदवार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएमचा उपयोग होणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त ईव्हीएम असून कुठेही कमतरता नाही. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील एकूण २०७७ मतदान केंद्राकरीता ३८०८ बॅलेट युनीट, २४९० कंट्रोल युनीट आणि २६७८ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहे. ईव्हीएमच्या तपासणीवेळी संबंधित कंपनीचे अभियंते बाहेरून येतात. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोरच पारदर्शक पध्दतीने तपासणी केली जाते.