चंद्रपूर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात १३ हजार ३९३ हेक्टर वरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये भात पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात व चंद्रपूर शहरात अवकाळी पाऊस सुरूच असल्याचे नुकसानीची आकडेवारी वाढणार आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. अशातच सोमवारी सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी पाऊस थांबला होता. मात्र तुरळक पाऊस जिल्ह्यात सर्वत्र सुरूच होता. त्यानंतर आज मंगळवारी देखील सर्वत्र ढगाळ वातावरण कायम होते. तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात व गावात पावसाची रिपरिप सुरूच होती.
हेही वाचा : पांढरे सोने काळे पडले अन् तूरही गळू लागली, विमा कंपन्या प्रतिसाद देईना; बळीराजा रडकुंडीला
चंद्रपूर शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे शहरातील नाले तुडूंब भरून वाहत होते. अनेक मंगल कार्यालय तथा घरी विवाह कार्यानिमित्त टाकण्यात आलेले मंडप वादळी पावसात उडून गेले. या पावसाचा सर्वाधिक फटका हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास १३ हजार ३९३ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली. यामध्ये भात पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यानंतर हरभरा व कापसाचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : लोहखनिज वाहतूक आणखी किती बळी घेणार? आठवडाभरात पाच जणांचा मृत्यू; अहेरीत तणाव
दरम्यान पाऊस सुरूच असल्यामुळे शेतीच्या नुकसानीचा आकडा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती तोटावार यांनी दिली. हवामान खात्याने आणखी दोन दिवस पाऊस सांगितला आहे. पावसामुळे वातावरण थंड झाले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्ष नेेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तथा कृषी मंत्री यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना तात्काळ मदत घोषीत करावी अशी मागणी केली आहे.