चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दुर्मिळ काळवीटचे संरक्षण व्हावे तसेच अभयारण्य कम्युनिटी रिझर्व किंवा कन्झर्वेशन रिझर्व घोषित करावे, अशी मागणी समोर आली आहे. अन्यथा काळवीट शिकार होईल अशीही शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. जगात अतिशय दुर्मिळ आणि केवळ भारतीय उपखंडात आढळणारे काळवीट हरीण चंद्रपूर जिल्ह्यात केवळ कमी-अधिक १५० संख्येत आहेत. परंतु ते असंरक्षित क्षेत्रात आढळत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. भद्रावती, कोरपना आणि चंद्रपूर तालुक्यात विरळ जंगल आणि शेतात अधिवास करून राहणाऱ्या ह्या अतिशय सुंदर प्राण्यांसाठी रेहकुरी काळवीट अभयारण्याच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा काळवीटांसाठी कम्युनिटी रीझर्व, कन्झर्वेशन रिझर्व किंवा अभयारण्य घोषित करावे अशी मागणी येथील पर्यावरण आणि वन्यजीव अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे वनसचिव, मुख्य वनसंरक्षक आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडे केली आहे.
अभिनेता सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणामुळे या सुंदर वन्य प्राण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. १० वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात काळवीट नाही असेच मानले जात होते, परंतु ते भद्रावती तालुक्यात दिसले आणि तेव्हापासून ते कधी कोरपणा तर कधी चंद्रपूर तालुक्यात क्वचित दिसले. केवळ वाघ, बिबट्याला महत्व देणाऱ्या वनविभागाने आणि लोकांनी काळवीटांची संख्या आणि संरक्षणाकडे फारसे लक्ष दिले नाही. केवळ गावकरी आणि शेतकरी आणि वन विभागाचे स्थानिक कर्मचारी ह्यांचे संरक्षणामुळे आज जिल्ह्यात त्यांची अंदाजे संख्या १५०-२०० च्या आसपास असावी. परंतु देशात काळविटांची होत असलेली शिकार, कमी संख्येत प्रजनन, नैसर्गिक मृत्यू, मांसाहारी प्राण्याची शिकार आणि असंरक्षित क्षेत्रात अधिवास अशा अनेक कारणांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात आढळणारे दुर्लभ काळवीट किती वर्षे तग धरून राहतील याबाबत शंका आहे. म्हणून राज्य शासनाने, वन विभागाने त्यांच्या क्षेत्रात अधिवास करून राहणाऱ्या काळविटांची संख्या मोजणे, त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे. किंवा त्यांच्यासाठी अभयारण्य, कम्युनिटी, कन्झर्वेशन रिझर्व घोषित करणे अत्यावश्यक आहे अन्यथा जी गत सारस आणि माळढोक पक्ष्यांची झाली आणि ते जिल्ह्यातून नामशेष झाले, तीच गत काळवीट प्राण्यांची सुद्धा होऊ शकते.
हेही वाचा : उदासीनतेमुळे यांत्रिकीकरणात महाराष्ट्राची पिछाडी, ‘आयसीएआर’चे उपमहासंचालक डॉ. एस.एन. झा यांची स्पष्टोक्ती
काळवीट हे हरीण प्रजातीचे वाटले तरी ते अन्टेलोप आहेत ( Antelope Cervicapra )त्यांना इंग्रजीत ब्लेक बक आणि संस्कृतमध्ये कृष्ण मृग म्हणतात. अनेक ठिकाणी त्यांना गझेल असेही म्हणतात. ते भारतात संखेने जास्त असले तरी ते धोकादायक वर्गात मोडतात . नरांना काळी पाठ आणि शिंगे असतात तर मादी भुऱ्या रंगाची असते. काळवीट वर्षातून २ पिले देतात. ते ८० किमी गतीने धावू शकतात आणि १० फुट उंच उडी मारू शकतात. प्राचीन ग्रंथात कृष्ण मृगांना चंद्र आणि वायू देवतेचे वाहन मानल्या जात होते आणि त्यांना पवित्र मानून पूजले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात वन विभागाचे वन्यजीव संरक्षण चांगले असले तरी काळवीट हे लाजरे जीव असल्याने ते सहसा दिसत नाही. परंतु ते शेती आणि उघडे वन,गवताळ भागात राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.
हेही वाचा : यवतमाळ – वाशिम लोकसभेसाठी काँग्रेस आग्रही ; या नावांची चर्चा….
ज्या भागात त्यांची संख्या जास्त आहे आणि उत्तम अधिवास आहे अश्या ठिकाणी लोकांच्या आणि वन विभागाच्या माध्यमातून अभयारण्य घोषित केले आणि संरक्षण केले तर निश्चितच जिल्ह्यात काळवीट मोठ्या संख्येत वाढतील . वन विभागाने काळवीटाणा ताडोबा बफर किंवा कोअर मध्ये स्थानांतर केले तर त्यांचे उत्तम संरक्षण होऊन पर्यटकांना सुधा सुंदर काळवीट पाहता येईल. सुरेश चोपणे हे गेल्या ४ वर्षापासून जिल्ह्यातील काळवीट प्राण्यावर लक्ष ठेवून असून त्यांच्या संरक्षणाची मागणी करीत आहे,
जिल्ह्याचे वन मंत्री हे वन्य जीवावर प्रेम करणारे असल्याने भविष्यात काळवीटासाठी अभयारण्य घोषित करणे कठीण नाही. महाराष्ट्रात १९८० मध्ये कर्जत जवळ रेहकुरी येथे लहानसे ,एकमेव काळवीट अभयारण्य आहे.त्याच धर्तीवर चंद्रपूर येथे असेच अभयारण्य व्हावे अशी सर्व वन्यजीव प्रेमींची इच्छा आहे अशी माहिती वन्यजीव अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी दिली.