चंद्रपूर :ब्ल्यूस्टार कंपनीच्या मुंबई विभाग प्रतिनिधीसह नागपूर व चंद्रपुरातील एंजटने चंद्रपुरातील एका डॉक्टरची एसी लावण्याच्या नावाखाली तब्बल ३५ लाख २१ हजार २७३ रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात अभिलाश शाहा, कार्तिकेयन, गुरुनानक रेफ्रिजेशनचे डिलरचे मालक गगनदीप सैनी, जसबीर सिंग सैनी या चौघांवर बीएनएस ३१८ (४), ३ (५) या कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. नामांकित असणाऱ्या ब्ल्यूस्टार कंपनीच्या प्रतिनिधीकडून झालेल्या या प्रकारामुळे विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न उद्भवत आहे.
चंद्रपुरातील एका हृदयरोग तज्ज्ञाचे पडोलीत नव्या रुग्णालयाच्या ब्लिडिंगचे सुसज्ज असे बांधकाम सुरु आहे. २ जानेवारी २०२३ रोजी ब्ल्यूस्टार कंपनीची एसी रुग्णालयात बसवावी, असा प्रस्ताव घेऊन ब्ल्यूस्टार कंपनीचे मुंबई विदर्भ विभागाचे प्रतिनिधी अभिलाश शाहा, कार्तिकेयन, गगनदीप सैनी हे गंजवॉर्ड येथील त्या डॉक्टरच्या रुग्णालयात गेले. त्यांनी ब्ल्यूस्टार कंपनीची एसी उत्तम असल्याचे सांगतिले. त्यांनी कंपनीकडून घेतलेल्या कोटेशनच्या आधारे गुरुनानक रेर्फिरेटर प्रा. लि. चंद्रपूरच्या खात्यावर २५ डिसेंबर २०२३ रोजी ३५ लाख २१ हजार २७३ रुपयांची रक्कम जमा केली. रक्कम जमा झाल्यानंतर ब्ल्यूस्टार कंपनीचे मुंबई प्रतिनिधी अभिलाश शाहा, कार्तिकेयन गगनदीप सैनी, जसबीर सैनी यांनी लवकरच काम सुरु करु असे आश्वासन दिले. थातूरमातूर काम केल्यानंतर काम बंद केले. तेव्हापासून हे सर्वचजण काम करण्यास असमर्थता दर्शवत आहेत. तसेच पैसेही परत देण्यास नकार देत आहेत. अशी तक्रार संबंधित डॉक्टरांनी शहर पोलिसांत दिली आहे. त्याआधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे डॉक्टरनी ब्ल्यूस्टार कंपनी डिलरच्या खात्यात पैसे वर्ग केल्यानंतर साईटवर काम सुरु केले. वायरिंग व कॉपर पाईपकींचे थोडेफार काम केल्यानंतर काम बंद केले. डॉक्टरांनी विचारणा केली असता, आज करू, उद्या करु असे सांगून वेळ मारुन नेली. मात्र आता एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असतानाही कामाला सुरुवात केली नाही. चंद्रपूर येथील ब्ल्यूस्टार कंपनीचे डिलर तथा गुरुनानक रेफ्रिजेशनचे मालक हे पैसे देऊनही काम करत नसल्याची माहिती ब्ल्यूस्टारच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी आज उद्या काम करतील असे आश्वासन दिले. त्यानंतर प्रतिसादच देणे बंद केले. मात्र डॉक्टरांकडून दररोज संपर्क करणे सुरु असताना कंपनीचे अधिकारी आता तुम्ही थेट कंपनीकडे पैसे टाका, तेव्हा काम सुरु करु असे सांगत असल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे. दरम्यान डॉक्टरच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच खळबळ उडाली आहे.