चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेचे पुरते तीन तेरा वाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर जीवती तालुक्यातील आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक चक्क दारू ढोसून शाळेत प्रवेश केला. झिंगाट अवस्थेत दोघेही पालकांना दिसून आले. संतापलेल्या पालकांनी या दोघांना जाब विचारीत धारेवर धरले. तसेच शिक्षकासोबत आलेल्या एका तरुणाला महिलांनी चोप दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालकांनी या दोघांचा व्हिडीओ बनविला. हा व्हिडिओ समाजमाध्यमात सार्वत्रिक झाला आहे. या तळीराम शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी पालक, विद्यार्थी यांनी केंद्रप्रमुखांमार्फत संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

हेही वाचा…सरकारने आरक्षण दिले, आता जरांगेंनी अट्टहास सोडावा – देवेंद्र फडणवीस

जिवती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसापूर या शाळेचे मुख्याध्यापक मेश्राम व सहाय्यक शिक्षक व्यंकटी भदाडे हे दोघे मद्यपान करून शाळेत आले होते. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असलेल्या या शाळेत तीन शिक्षक कार्यरत आहेत. यातील दोन शिक्षक नियमित शाळेत मद्यपान करून येत असल्याचा विद्यार्थी व पालकांचा आरोप आहे. या दोघांची तक्रार विद्यार्थी व पालकांनी अनेकदा केली. मात्र त्यांचेवर कुठलीही कारवाई जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केली नाही‌.

ग्रामस्थांनी त्यांना अनेकदा सुधारण्याची संधीही दिली होती. त्यांच्यात काही बदल झाला नव्हता. शुक्रवारला या दोघांनी कहरच केला. अतिशय झिंगाट अवस्थेत दोघे शाळेत पोहचले. आणि दारू पिलेल्या अवस्थेत वर्गात गेले. त्यांचा प्रताप बघून पालक चांगलेच संतापले. पालकांनी या दोघांना धारेवर धरले. काहींनी व्हिडिओ काढला. यावेळी तळीराम शिक्षकाला जाब विचारण्यात आला. विद्यार्थी शिक्षक दारू पिऊन आल्याचे सांगत होते. दारू सोबत वर्गात बिडी पितात असेही सांगितले.

हेही वाचा…राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हावर वडेट्टीवार म्हणाले, “तुतारी वाजवायला ‘हात’… ”

दरम्यान या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरलं झाला अन् शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. या प्रकाराची वरिष्ठांनी तात्काळ दखल घेतली. शाळेला दोन शिक्षक पाठविण्यात आले आहेत. चौकशी नंतर या दोघांवर कार्यवाही होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या शिक्षका सोबत आलेल्या तिसऱ्या व्यक्तीला महिलांनी चांगलाच चोप दिला. ग्रामीण भागात शिक्षकच दारू पिऊन वर्गात येत असेल तर त्याचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होईल असा प्रश्र्न पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे शिक्षक नियमित दारू पिऊन येतात मात्र शिक्षणाधिकारी यांचे नेमके याकडे लक्ष नाही असेही पालकांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur drunk headmaster and teacher at ashapur zp school face angry parents rsj 74 psg