चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर हा मुख्य मार्ग अतिक्रमणाच्या विळख्याने अरुंद होत चालला आहे. हा मार्ग बिर्याणी, नॉनवेज, चायनिज स्कॅक्स, साऊथ इंडियन नास्ता, मॅगी सेंटर, पकोडे, दाभेली, मोमोज व चहा, कॉफीचे हातठेल्यांपासून फळविक्रेते, खासगी प्रवासी बस, जुनी चारचाकी, दुचाकी वाहने विक्रीची दुकाने अवैधरित्या थाटणाऱ्यांनी तसेच दुचाकी व चार चाकीचे मोठ्या शो रूम चालकांनी अतिक्रमण करून गिळंगृत केला आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस तथा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मुख्य मार्गावरील या अतिक्रमणाकडे अक्षरश: दुर्लक्ष झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर मार्ग हा चंद्रपूर शहरात प्रवेश करणारा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहापासून तर पडोलीपर्यंत व सिटी पोस्ट ऑफिसपासून तर यशवंत नगर जवळील इरई नदी पुलापर्यंत दोन्ही बाजूंनी अतिक्रमणधारकांनी गिळंगृत केलेला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच जिल्ह्यात कार्यरत इतर विभागाचे सर्व अधिकारी याच मार्गाने दररोज शासकीय चार चाकी वाहनाने जाणे-येणे करतात, जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीशांची सर्व शासकीय निवासस्थाने नागपूर मार्गावरील संजय गांधी मार्केट समोर आहेत.

हेही वाचा : रविकांत तुपकरांच्या अटकेचे पडसाद… ठिकठिकाणी टायरची जाळपोळ

मात्र याच भागात या फेरीवाल्यांनी सर्वाधिक अतिक्रमण करून ठेवले आहे. सायंकाळी चार वाजतापासून या मार्गावरील सर्व बिर्याणी सेंटरचे हातठेले, नॉनवेज, चायनिज स्कॅक्स, साऊथ इंडियन नास्ता, मॅगी सेंटर, पकोडे, दाभेली, मोमोज व चहा, कॉफीची दुकाने, समोसा, कचोरीपासून सर्व हातठेले सुरू होतात. डीएनआरपासून तर सर्व खासगी प्रवासी बसेस यांनी या मार्गावर अतिक्रमण करून जणू काही त्यांच्या मालकीची जागा आहे या थाटात बसेस मुख्य रस्त्याच्या मधोमध लावून ठेवतात. त्याचा परिणाम सिंचन विभागाचे या मार्गावरील कार्यालय या खासगी प्रवासी बसेसने दिसेनासे झाले आहे. याच मार्गावर शासकीय विश्रामगृह, सिंचाई विभागाचे विश्रामगृह, चंद्रपूर सिंचन विभागाचे कार्यालय तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे.

हेही वाचा : रविकांत तुपकर पोलिसांच्या ‘ताब्यात; कारण काय? जाणून घ्या…

मात्र, अतिक्रमणामुळे ही सर्व कार्यालये व विश्रामगृह झाकोळले आहेत. शहरातून नागपुरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. दुकानासमोर पार्किंग करणाऱ्या नागरिकांची वाहने थोड्या वेळापुरती दुकानासमोर उभी राहतात. मात्र, विक्री करणाऱ्यांची वाहने पूर्ण वेळ रस्त्यावर उभी राहतात. यामुळे या अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. असेच होत राहिले तर एक दिवस संपूर्ण नागपूर मार्ग अतिक्रमणधारक गिळंगृत करतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आजवर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर महापालिका आयुक्तांपर्यंत वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. मात्र कारवाई शून्य आहे. तेव्हा संपूर्ण रस्त्यावर अतिक्रमण होण्यापूर्वी येथील अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी समोर आली आहे.

सात वाहनांवर जप्तीची कारवाई

रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस व चंद्रपूर महापालिकेद्वारे संयुक्त कारवाई केली आहे. नागपूर रोडवर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची ७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ८ ते १० चारचाकी वाहनांवर दंड तर पल्सर, पॅशनप्रो, ॲक्टिव्हा अशा दुचाकी जप्त करण्याची कारवाई आरटीओ मार्फत केली आहे. जोपर्यंत दंडाचा भरणा होणार नाही तोपर्यंत या वाहनांची विक्री होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पदपथावर छोटी हातगाडी, मोठे ठेले उभे करून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना २४ तासांच्या आत त्यांचे अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या आहे. अतिक्रमण न हटवल्यास छोटे, मोठे ठेले व त्यांचे साहित्य जप्त करण्यात येणार आहे. पुढील २४ तासानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur encroachment on chandrapur nagpur main highway due to negligence by the police and district administration rsj 74 css
Show comments