चंद्रपूर: प्रदूषण नियंत्रण मंडळाची कुठलीही परवानगी न घेता इरई नदीला लागून जुनी पडोली व मौझा विचोडा बुजरूक या गावात शहरातील धनाड्य लोकांनी शेतीच्या जागेचा औद्योगिक वापर करून चंद्रपूर फेरोअलाय प्लान्ट (सेल) मधील कच्च्या लोह दगडाचे क्रशरचा उद्योग विनापरवानगी सुरू केल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या उद्योगातून निघणाऱ्या धुळीमुळे तसेच प्रदूषणामुळे या भागातील शेती, आंब्याच्या बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या असून इरई नदी, विहिरी व हातपंपाचे पाणी प्रदूषित काळे झाले आहे.

चंद्रपूर – नागपूर मार्गावर जुनी पडोली व मौझा विचोडा बुजरूक या गावातील राधास्वामी मठाच्या बाजूला परंपरागत शेतीच्या जागेवर प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, ग्राम पंचायतची कुठलीही परवानगी नसताना चंद्रपुरातील श्रीकांत कावळे, पप्पू सिंग व अन्य एक अशा तीन व्यवसायिकांनी एकत्र येत कच्च्या लोह दगडाचा क्रशरचा उद्योग येथे सुरू केला आहे. मूल मार्गावरील चंद्रपूर फेरोअलाय प्लान्ट (सेल) या कारखान्यातून निघणाऱ्या कोळशासारख्या कच्चा लोह दगड येथे क्रशरमध्ये टाकून त्याचे तुकडे केले जातात. तसेच बारीक भुकटीही तयार केली जाते. ही लोह दगडाचे तुकडे व भुकटी आसाम तसेच देशातील इतर राज्यातील उद्योगांना विकण्यात येते.

शेतीच्या कृषक जमिनीवर हा व्यवसाय सुरू करता येत नाही. मात्र या धनाड्यांनी गावातील शेतजमिनीवर हा औद्योगिक व्यवसाय सुरू केलेला आहे. वास्तविक हा उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने एमआयडीसीची जागा निश्चित केलेली आहे, परंतु इथे चंद्रपूर फेरोअलाय प्लान्ट (सेल) मधून मोठ्या प्रमाणात कच्चा लोह दगड शेतात आणून त्याची भुकटी करून व्यवसायिक दृष्ट्या बाहेर पाठवून विकल्या जात आहे. हा व्यवसाय येथे जोरात सुरू असून रात्रंदिवस या भागात ट्रकांची वाहतूक सुरू झाली आहे. विशेष म्हणजे याच क्रशरच्या बाजूला अर्बन ऑरगॅनिक, अर्बन प्रोटीन्सचा प्रकल्प आहे. तर एका बाजूला राधास्वामी सत्संग आहे. तर या भागात आंबे, धान, कापूस, सोयाबिनची शेती देखील मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र क्रशर मधून निघणाऱ्या प्रदूषण व धुळीमुळे संपूर्ण शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच या क्रशरपासून काही अंतरावर इरई नदीचे पात्र आहे. गावातील विहिरी व हातपंप देखील आहेत. पावसाळ्यात पाणी आला की या क्रशरमधील काळी माती, लोह नदीपात्रात जात असून संपूर्ण नदीपात्र दूषित होत आहे.

या भागातील शेतात मोठ मोठे काळे दगडाचे डोंगरासारखे उंचवटे तयार झालेले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या शेताच्या जमिनीवर व शेतमालावर विपरीत गंभीर परिणाम झालेला असून या परिसरातील हवा, जमीन व पाणी दूषित पूर्णत: होऊन शेतीचे अपरिमित नुकसान होत आहे. तरी शासनाने उचित कारवाई करून हे अवैध धंदे लवकरात लवकर बंद करावे व परंपरागत शेती वाचवावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी लोह क्रशरचे भागिदार श्रीकांत कावळे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसतांना आम्ही हा व्यवसाय सुरू केल्याची माहिती दिली. परवानगीसाठी अर्ज केला आहे असेही ते म्हणाले. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळात संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यन या अनधिकृत व्यवसायाची तक्रार जिल्हाधिकारी विनय गौडा, पालकमंत्री अशोक उईके, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेही करण्यात आली आहे.