चंद्रपूर : विजेच्या तारामुळे झालेल्या वादात बाप व मुलांने चक्क शेजाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून धड शिरावेगळे केल्याची धक्कादायक घटना मूल तालुक्यातील हळदी येथे शनिवारी सकाळी घडली. राजेश बोदलकर असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुरूदास पिपरे व सुरज पिपरे या बाप-लेकांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजेचे तार नेण्यावरून राजेश बोदलकर व गुरूदास पिपरे, सूरज पिपरे यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गुरूदास व सुरज पिपरे या बाप लेकांनी चक्क कुऱ्हाडीने बोदलकर यांच्यावर हल्ला केला. यावेळी राजेश बोदलकर यांना मारहाण करून कुऱ्हाडीने शिर धडावेगळे केले. ही बाब गावकऱ्यांना माहिती होताच संपूर्ण गाव घटनास्थळाकडे धावून आले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. आरोपी बाप-लेक स्वत:चा बचाव करीत पळून गेले. अन्यथा, या बाप लेकाला गावकऱ्यांनी तिथेच धडा शिकविला असता. त्यामुळे बापलेक थोडक्यात बचावले.

हेही वाचा…मोदी हे भ्रष्ट लोकांचे सरदार… ‘मुंह मे राम दिल मे नथुराम’… पटोलेंची कठोर टीका

दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलीस ताफ्यासह हळदी गावात दाखल झाले. म़ृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. या हत्येनंतर पसार झालेल्या बापलेकाला मूल पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. अतिशय निर्घृणपणे ही हत्या केल्याने ग्रामस्थ कमालीचे संतापले आहेत. आरोपींना आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही दोघांनाही धडा शिकवू असेही ग्रामस्थ पोलिसांसमोर बोलत होते. त्यामुळे पोलिसांचीही चिंता वाढली आहे.

हेही वाचा…१४० एकर जमिनीवर आमदार समीर कुणावार यांचा डोळा, तर कुणावार म्हणतात…

यापूर्वीही या जिल्ह्यात धडापासून शिर वेगळे केल्याची हत्याकांड झालेली आहेत. दुर्गापूर येथे गुंडाला ग्रामस्थांनी चोप देवून एकाचे धड शिरावेगळे केले होते. त्यानंतर ताडाळी येथे एका मुलीची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातही त्याचे लोण पसरत आहे. वीज तारांच्या छोट्या व क्षुल्लक कारणावरून इसमाची हत्या केल्याने लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या हत्याकांडात सहभागी बापलेकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे केली आहे. या दोन्ही आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या हत्याकांडानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur father and son arrested for brutal ax murder over electric wire dispute near haldi mul tehsil rsj 74 psg
Show comments