चंद्रपूर: ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांना रिसोर्ट प्रमाणे कुटी तयार करून देण्याच्या नावावर गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन प्रत्यक्ष कोणतेही बांधकाम न करणा-या भरत नानाजी धोटे (वय ३८) रा. तुकूम, चंद्रपूर याने ४१ लक्ष ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूरकडून करण्यात येत आहे. सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्याच्या दिनांकापासून फरार असून कोणत्याही नागरिकाला याबाबत माहिती असल्यास किंवा आरोपी आढळून आल्यास त्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला द्यावी, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिस स्टेशन दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर येथे सर्व पिडीत अन्यायग्रस्त फिर्यादी तर्फे अशोक पांडुरंग भटवलकर, रा.म्हॉडा कॉलनी, दाताळा, चंद्रपूर यांच्या लेखी रिपोर्ट वरून आरोपी भरत नानाजी धोटे, रा. तुकुम, चंद्रपूर यांनी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या मार्फतीने मौजा पद्मापूर, अजयपूर, देवाडा, तळोधी (नाईक), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे बांधकाम करण्याबाबत युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा केला. ताडोबा राष्ट्रीय वन उद्यान येथे फिरण्यास येणाऱ्या लोकांना रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाणे देऊन येणारे प्रतिमहिना मासिक उत्पन्न ७०८३ रुपये देण्याचे प्रलोभन देऊन प्रत्येक गुंतवणुकदारांकडून २ लक्ष ५० हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात कुटीचे बांधकाम न करता गुंतवणूकदारांची एकुण ४१ लक्ष ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केली. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरुन सदर गुन्हा नोंद असुन गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.
हेही वाचा : छत्तीसगडमधील चकमकीत एका जहाल नेत्यासह ९ नक्षलावादी ठार
सदर गुन्हयातील आरोपी भरत नानाजी धोटे हा गुन्हा दाखल झाल्याच्या तारखेपासून फरार आहे. तरी सदर आरोपीचा शोध घेण्याकरीता तसेच नमुद आरोपी का कोणास आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर ०७१७२-२७३२५८, ०७१७२-२६४७०२ या क्रमांकावर तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर (मो. नं. ९३५९२५८३६५ या क्रमांकावर माहिती देण्यात यावी, असे आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालय, चंद्रपूर यांनी कळविले आहे.