चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठात प्राध्यापक नोकर भरती प्रकरण, दीक्षांत सोहळ्यातील अव्यवस्थेच्या चौकशीसाठी २० नोव्हेंबर रोजी चौकशी समिती गठित केली. सिनेटने नोकर भरतीत घोळ झाल्याचे मान्य केल्यानंतरही चार महिन्यांपासून समितीची एकही बैठक झालेली नाही. माहिती अधिकाराचे उल्लंघन, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या २२ हेड अंतर्गत शून्य निधी खर्च, दीक्षांत सोहळ्यावर ८० लाखांची उधळण या सर्व प्रकरणात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे दोषी आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. बोकारे यांना राज्यपालांनी परत बोलवावे, अशी मागणी सिनेट सदस्यांनी केली आहे.
येथील विश्रामगृहावर सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी, नीलेश बेलखेडे, डॉ. कन्नाके यांनी पत्रपरिषद घेऊन विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत बोलू न दिल्याने ‘वॉकआऊट’ करावे लागले अशी माहिती दिली. गोंडवाना विद्यापीठात मोठ्या प्रमाणात अनियमित कामे सुरू आहे. कुलगुरू डॉ. बोकारे यांच्या आशीर्वादाने ही सर्व कामे सुरू आहेत, असा थेट आरोप सिनेट सदस्यांनी केला आहे. नोकर भरती प्रकरणाची चौकशी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या समितीमध्ये नोकर भरतीचे सदस्य सचिव डॉ. अनिल चिताडे यांना स्थान दिल्याने त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विद्यापीठात सर्रास माहिती अधिकाराचे उल्लंघन सुरू आहे.
हेही वाचा : जहाल नक्षलवाद्याचा आजाराने मृत्यू, पोलिसांच्या परवानगीने एटापल्ली तालुक्यातील स्वगावी केले अंत्यसंस्कार
विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी पदावर साकेत दशपुत्रे यांची नियुक्ती केली. मात्र, त्यांची नियुक्ती पात्र नसल्याने दशपुत्रे यांना नोकरी सोडावी लागली. विशेष म्हणजे, दशपुत्रे यांना विद्यापीठाने ११ लाख ७० हजार रुपये अग्रीम रक्कम परस्पर दिली आहे. हे सर्व प्रकार बघता राज्यपालांनी कुलगुरूंना परत बोलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.