चंद्रपूर : राज्याच्या एका टोकाला असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्याशा तालुक्यात आज राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, एवढ्यावरच न थांबता भविष्यात येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. आज पेटवलेली मशाल केवळ एका स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक खेळाडूने वर्षभर ती स्वत:च्या मनात धगधगती ठेवावी, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आदी उपस्थित होते.
हेही वाचा : सावधान! शासकीय नोकरीचे आमिष दाखवणारी टोळी सक्रीय
मुनगंटीवार पुढे म्हणाले, राज्याच्या कानाकोपऱ्यातील उदयोन्मुख खेळाडू वाघाच्या भूमीत आले आहेत. येथून परत जाताना वाघासारखा पराक्रम आणि स्पर्धेचा आनंद सोबत घेऊन जा. २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. जागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत आपल्या खेळाडूंना जास्त पदके मिळवता आली नव्हती. मात्र, अलीकडेच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. क्रीडा क्षेत्राकडे सरकार विशेष लक्ष देत असून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने डोळ्यापुढे ऑलिम्पिकचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा : नागपूर: चारित्र्याच्या संशय! पत्नीच्या पोटात भोसकला चाकू
खेळाडूंना मोफत ताडोबा पर्यटन
६५ टक्के वाघ भारतात असून सर्वाधिक वाघ हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे राज्यभरातून येथे आलेल्या खेळाडूंसाठी मोफत ताडोबा पर्यटनाचे नियोजन करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील आठ महसूल विभाग तसेच पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी अशा एकूण ९ विभागांमधून १६०० खेळाडू आणि त्यांच्यासोबत ७०० पालक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विसापूर येथे आले आहेत.