चंद्रपूर: सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड पॉलिसी या संशोधन संस्थेने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करून धक्कादायक निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान मागील ३० वर्षांच्या तुलनेत २०२१-२०५० या काळात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. पाऊस आणि अति पावसाचे दिवस आणि प्रमाण वाढणार असल्याचे पूर्वानुमान काढले आहे .चंद्रपूरमध्ये आनंदाची बाब म्हणजे येथील उच्च तापमान आणि उष्ण लहरींच्या संख्येत घट होणार असल्याचे अनुमान काढले आहे. बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम महापूर, शेती वने, वन्यजीव,आरोग्य आणि विकास कामावर होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगलोर आणि नोयडा येथील सेंटर फॉर सायन्स, टेक्नालोजी अ‍ॅण्ड पाँलोसी या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी जानेवारी २०२२ मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आणि आयपीसीसी आकडेवारीवरून १९९० ते २०१९ या मागील ३० वर्षांच्या तुलनेत भविष्यातील २०२१ -२०५० या वर्षात वायू प्रदूषनाची मध्यम आणि जास्त वाढ झाल्यास हवामानावर किती परिणाम होईल यावरून महाराष्ट्रातील हवामान बदलाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा – गोंडवाना विद्यापीठात ‘पेट पास’ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळेना!

मागील अनेक वर्षांच्या तुलनेत चंद्रपूरमध्ये उष्ण लहरीच्या घटनात वाढ झाली आहे, परंतु आनंदाची बाब म्हणजे २०२१ ते २०५० दरम्यान चंद्रपूर येथे उष्ण लहरीचे दिवस काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. परंतु अत्याधिक तीव्रतेच्या उष्ण लहरी वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या अभ्यासातून वर्तविली आहे. चंद्रपूरचे सरासरी तापमान इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सुरवातीच्या वर्षात वाढत्या वायू प्रदूषणाच्या संदर्भाने कमी म्हणजे ०.८ डिग्री असेल तर पुढील टप्प्यात १.२ डिग्री वाढेल. हिवाळ्यातील तापमानसुद्धा १.५ ते २.४ डिग्रीने वाढेल असा अंदाज या अभ्यासातून वर्तविण्यात आला आहे.

चंद्रपूरमध्ये पाऊस आणि अति पाऊस वाढणार- २०२१-२०५० च्या वाढत्या प्रदूषणानुसार चंद्रपुरात पावसाचे ७ दिवस वाढणार आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यात पावसाचे दिवस कमी होऊन ६ दिवस होणार आहे. खरीप हंगामात सुरवातीच्या वर्षात ८ % तर नंतरच्या वर्षांत १७ % वापसाचे प्रमाण वाढेल. परंतु रब्बी हंगामात हे प्रमाण सुरवातीच्या वर्षात १० % तर नंतरच्या वर्षात २०% वाढेल.चंद्रपूरमध्ये सुरवातीच्या काळात अति पावसाच्या घटना २ घटना आणि नंतरच्या काळात दरवर्षी ३ घटना घडणार. पुढील काळात ढगफुटी सारख्या १ ते २ घटना घडणार आहेत. मागील इतिहासातील ३० वर्षांत अति पावसाच्या घटना पाहता त्यांची संख्या ११४ होती परंतु असेच प्रदूषण वाढले तर १८० घटना आणि अति प्रदूषणानंतर २१२ होतील. त्याचसोबत मागील ३० वर्षांत ढगफुटीसारख्या घटनांची संख्या ३६ होती त्या वाढून सुरवातीला ५६ होतील आणि नंतरच्या काळात ८५ होतील. मागील ३० वर्षांत कमी पावसाचे वर्षे १२ होते ते घटून १० वर्षे होतील म्हणजे दुष्काळी वर्षे कमी होतील. बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम महापूर, शेती वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकास कामावर होणार अशी माहिती पर्यावरण आणि हवामान अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

विदर्भात तापमान वाढीचा धोका

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर २०२१-२०५० च्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तापमान १ ते २ डिग्री वाढण्याचा अंदाज अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत उष्ण लहरीचे प्रमाण कमी होणार असल्या तरी त्यांची तीव्रता वाढणार आहे. विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील ही तीव्रता वाढणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांनो सतर्क रहा; ‘या’ एक्सप्रेसच्या मार्गात बदल

विदर्भात अत्याधिक पावसाच्या घटना वाढणार

विदर्भात आधीच्या १९९० ते २०१९ दरम्यान अति पावसाच्या घटना घडल्या त्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी विदर्भातील जिल्ह्यात २ ते ८ अति पावसाच्या किंवा ढगफुटीच्या घटना घडतील. सध्याच्या वायू प्रदूषणाच्या वाढत्या अंदाजानुसार यवतमाळ वगळता सर्वच जिल्ह्यांत पावसाचे दिवस वाढणार आहेत.

महाराष्ट्राला तापमान वाढीचा धोका

येत्या २०२१-२०५० पर्यंत महाराष्ट्रात तापमान १ अंश तर असेच प्रदूषण राहिले तर २ डिग्री सेल्सियस तापमान वाढ होईल. महाराष्ट्रातील उन्हाळ्यात ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढ होईल. तर हिवाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र व विदर्भात तापमान वाढ जास्त होईल. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात हिवाळ्याचे तापमान मात्र कमी होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur less heat wave but monsoon heavy rains will increase study report of research institute rsj 74 ssb
Show comments