चंद्रपूर: वायू प्रदूषणामुळे घुग्घुसवासियांचा श्वास गुदमरत असतांना व राज्यात प्रदूषणाची सर्वाधिक धोक्याची पातळी घुग्घुसने गाठलेली असतांना लॅायड मेट्ल्स उद्योग समुहाचा ४० लाख टन प्रतिवर्ष क्षमतेचा विस्तारित प्रकल्प येथे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास घुग्घुस आणि परिसरातील नागरिकांना प्रदूषणामुळे गाव सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू केला आहे.

घुग्घुस येथील लायड्स मेटल्स प्रकल्पात दिवसाला पाचशे मेट्रीक टन प्रति स्पॅांज आयरनचे उत्पादन घेतले जाते. २००६ ला या प्रकल्पाची क्षमता वाढली आणि उत्पादन २ लाख ७० हजार मे. टनापर्यंत पोहचले. आधीच या प्रकल्पामुळे प्रदूषणाची समस्या तीव्र आहे. या परिसरात २०२४ या वर्षात प्रदूषण निर्देशांक ६३.६३ एवढा नोंदविला गेला. तो धोक्याच्या पातळीजवळ पोहचला आहे. २०१३ मध्ये घुग्घुस प्रदूषणचा (वायू, जल आणि जमीनीचे प्रदूषण)निर्देशांक ८१.९० इतका होता. यावरून येथील प्रदूषणाची तीव्रता लक्षात येते. विशेष म्हणजे स्पॅांज आयरनच्या प्रकल्पांना प्रदूषणामुळे जगभरात विरोध होते आहे. अनेक प्रकल्प बंद पाडले. मात्र आता घुग्घुस येथे या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा घाट घातला जात आहे. घुगुस च्या चारही बाजूला असलेली गावे आधीच प्रदूषित आहेत. त्यातही उसेगाव हे गाव प्रदूषणाचे केंद्रबिंदू आहे. या गावातील कापसाची शेती उद्धवस्त झाली आहे.

हेही वाचा : भजनी मंडळाचा टेम्पो नाल्यात पडला, दोन लहान मुली गेल्या वाहून, १३ किरकोळ जखमी

लायड्स मेटल्ससाठी कच्चा लोखंड जिल्ह्याबाहेरून आणला जातो. चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, आष्टी, अहेरी, सिरोंचा या भागातील वाहतुकीचे रस्ते अवजड वाहनांनी पूर्णतः खराब केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याती रस्ते खऱाब झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्याच्या शेजारील गावांचे रंग लाल झाले आहे. नद्यांतील पाण्याचा रंग लाल झालेला आहे. त्यामुळे एका कारखान्या साठी अनेक गावे प्रदूषित होऊ लागली आहेत. अपघात वाढले आहे. त्यामुळे या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध असल्याचे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्रा. सुरेश चोपणे डॉ. योगेश दूधपचारे डॉ. सचिन वझलवार म्हटले आहे. यासंदर्भात त्यांना राज्याचे मुख्यमंत्री, पर्यावरण विभागाचे सचिव आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठविले आहे. ३० सप्टेंबरच्या जनसुनावणीला विरोध केला आहे. प्रदुषणमुक्त जीवन जगायचे असेल तर या प्रकल्पाला विरोध करावा असे आवाहन पर्यावरणवाद्यांनी केले आहे.

श्वसनाचे आजार वाढले

घुग्गुसचे प्रदूषण आधीच कोळसा खाणींमुळे वाढलेले आहे. या परिसरात थर्मल, मायनिंग आणि स्पॉंज आयरन प्रकल्प आहे. त्यामुळे येथील प्रदूषण आता निर्सग सुद्धा सहन करू शकत नाही. आरोग्याच्या समस्या वाढल्या आहरे. घरोघरी श्वसनाचे आजार जडले आहे. जगभरातील स्पॉंज आयरन प्लांट्स ला कोळसा आधारित आणि गॅस आधारित अशा दोन प्रकारात विभागले जाते. नैसर्गिक वायूवर आधारित प्लांट्स हे प्रदूषणाच्या संदर्भात इको फ्रेंडली समजले जातात, पण घुग्गुस येथील प्रकल्प हा कोळशावर आधारित आहे, त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता आणखीनच वाढणार आहे.

हेही वाचा : मेट्रोचे उद्घाटन, पाऊस अन् मोदींचा दौरा रद्द; जे नागपुरात घडले होते तेच पुण्यात…

लायड़्स बंद करण्याचे आदेश

सन २०१८ मध्ये प्रदूषण मानके आणि अटींचे उल्लंघन केल्यामुळे घुग्घुस येथील लायड्स मेटल्स प्रकल्प बंद करण्याच आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणात सर्वात मोठा वाटा या कंपनीचा आहे, असा खळबळजनक अहवाल नीरी या संस्थेने दिला होता. हा प्रकल्प तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आर्शिवादाने प्रदूषणात भर घालणारा हा अद्योग आता विस्तारीत प्रकल्पाच्या तयारी आहे.